योगेश पांडे
नागपूर : राजकीय व सिने क्षेत्रातील परखड भाष्य करणारे व खडेबोल सुनावणारे दोन व्यक्तिमत्त्व म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व नाना पाटेकर. रस्ते सुरक्षेच्या मुद्द्यांवर दोघेही संवेदनशील असून या विषयावर नागपुरात झालेल्या मुलाखतीचा कार्यक्रम चांगलाच रंगला. नाना पाटेकरांच्या भरधाव प्रश्नांवर गडकरींनी संयमित उत्तरे देत सुरक्षित ‘ड्रायव्हिंग’ केली. विशेष म्हणजे वयाच्या साठीनंतर ड्रायव्हिंगमधून निवृत्ती का नको हा नानांचा सवाल एका नवीन चर्चेला सुरुवात करणारा ठरला.
नागपुरात रविवारी ‘न्यूज १८- लोकमत’तर्फे वनामती सभागृहात आयोजित रस्ते सुरक्षा मोहिम कार्यक्रमादरम्यान अभिनेते नाना पाटेकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी नाना पाटेकर यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या ड्रायव्हिंगचा मुद्दा मांडला. वयाच्या साठीनंतर शरीर थकते व डोळेदेखील हवी तशी साथ देत नाहीत. अशा स्थितीत त्यांना ड्रायव्हिंगमधून निवृत्ती का नको किंवा एखादी चाचणी आवश्यक का नको असा सवाल नाना पाटेकर यांनी केला. ६५ वर्षे वयानंतर लोकांनीच स्वतः ठरवायला हवे की आपले वय झाले आहे, आता आपण गाडी चालवणार नाही. लोकांनी आपल्या सुरक्षेचा निर्णय स्वतःच घ्यावा, असे गडकरी म्हणाले. मी स्वत: गाडी चालविणार नाही अशी घोषणा नाना पाटेकर यांनी यावेळी केली.
देशातील ३६०० ब्लॅक स्पॉट्स शोधले
देशातील रस्ते चांगले होत असताना त्यावरील अपघातांमध्ये होणारे मृत्यू हा निश्चितच चिंतेचा विषय आहे. अपघात होण्यामागची कारणे शोधून त्यावर आम्ही उपाययोजना करतोय. रोड इंजिनियरिंगमध्ये असलेल्या त्रुटी सुधारण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी ३६०० ब्लॅक स्पॉट्स शोधून काढले आहेत. नागपूर जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट्सदेखील शोधण्यात आले असून ते लवकरच सुधारण्यात येतील, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले.
देशात वाहतुकीचे नियम कडक केले व दंडदेखील वाढवला. अगदी कठोर कायदेदेखील केले. मात्र तरीदेखील अपघात थांबलेले नाहीत. रस्ते चांगले झाले म्हणून अपघात होत आहेत, अशी टीका काही लोक करतात. मात्र प्रत्यक्षात प्रशासन, जनता या सगळ्यांनी मिळून यासाठी पुढाकार घ्यायची गरज आहे. नागरिकांमध्ये वाहतूकीच्या नियमांबाबत संवेदनशीलता निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे धडे मिळाले पाहिजे. त्यासाठी शाळा, महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था यांनी प्रयत्न करायला पाहिजेत, असे गडकरी म्हणाले.
मानवी वर्तन बदलल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही
देशात रस्ते अपघातांत १ लाख ६८ हजार मृत्यू होतात. मृत्यू होणाऱ्यांमध्ये १८ ते ३४ वर्षे वयोगटाच्या तरुणांचे ६५ टक्के प्रमाण आहे. ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. एखाद्या कुटुंबातील तरुणाचा मृत्यू झाला की त्याच्या कुटुंबाचे मोठे नुकसान होत असते, अशी वेदना गडकरी यांनी बोलून दाखविली. लोकांना कायद्याची भीती नाही आणि कायद्याबद्दल सन्मानही नाही. समाजाने यात सुधारणा केली तर अपघात नक्कीच कमी होती. मानवी वर्तन बदलल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
महामार्गांसाठी बस कोड तयार
देशात चारचाकींमध्ये सहा एअरबॅग्स अनिवार्य केल्या आहेत. ट्रकच्या कॅबिनमध्ये एअरकंडीशन अनिवार्य करण्यात आले आहे. समृद्धी महामार्गावरील घटनेनंतर बस कोड तयार केला आहे. जर्मनी, इंग्लंडप्रमाणेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व्हॉल्वो बसेस लवकरच भारतातही बघायला मिळतील, अशी माहिती गडकरी यांनी दिली.
चार वर्षांत नागपुरातील सर्व रस्ते कॉंक्रीटचे करणार
यावेळी गडकरी यांनी नागपुरातील कॉंक्रीटचे रस्ते पुढील अनेक वर्षे टिकतील असा दावा केला. शहरात व्हाईट कॉक्रिंटने तयार करण्यात येणारे रस्ते मजबूत आहेत. येत्या चार वर्षांत इतर सर्व महत्त्वाचे रस्तेदेखील कॉंक्रीटचे करणार असे त्यांनी सांगितले.