नागपूर : ‘चार वर्षांपूर्वी मी पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. समाजाकडून मला भरपूर मिळालं आहे व यापुढेही घेत राहणे मला इष्ट वाटत नाही. पुरस्कार देणाऱ्या सर्व संस्थांचा आदर राखून व त्यांचे आभार मानून ही माझी भूमिका मी मांडत आहे,’ अशी भावना जाहीर करत प्रसिद्ध साहित्यिक अनंत यशवंत खरे उपाख्य नंदा खरे यांनी २०२१ साली जाहीर झालेल्या २०२० चा साहित्य अकादमी पुरस्कार नाकारण्याचा निर्धार पाळला होता. यापूर्वीही त्यांनी विदर्भ साहित्य संघातर्फे २०१९ साठी जाहीर झालेला ‘जीवनव्रती’ हा पुरस्कार नम्रपणे नाकारला होता. विशेष म्हणजे, नकार कळविण्याला कोणतेही राजकीय, वैचारिक वा बायकॉटचे कारण नव्हते, हे त्यांच्या जाहीर स्पष्टीकरणानेच स्पष्ट झाले होते. नागपुरात जन्म व शिक्षण झालेल्या या साहित्यिकाचे नागपूर व विदर्भावर प्रचंड प्रेम होते आणि ते त्यांच्या साहित्यातूनही प्रकट झाले आहे. साहजिकच त्यांच्या निधनाने विदर्भाचे साहित्य विश्वही हळहळले आहे.
‘दक्षिणायन’च्या लढ्यातील प्रमुख शिलेदार
- गेल्याच महिन्यात २० जूनला पुणे येथे नंदा खरेंची भेट घेतली. राजकीय हुकुमशाही, आर्थिक भ्रष्टाचार आणि पर्यावरणाची नासाडी हे त्यांच्या सर्वच लेखनाचे मुख्य सूत्र होते. त्यांच्यासारखे नैतिक भूमिका घेऊन व्यवस्थेच्या विरोधात उभे राहणारे लेखक दुर्मिळ आहेत. त्यांच्या ‘उद्या’ कादंबरीला मिळालेल्या साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांनी याच भावनेतून नाकारला होता. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संदर्भात आम्ही महाराष्ट्रात उभारलेल्या ‘दक्षिणायन’च्या लढ्यातील ते एक प्रमुख शिलेदार होते. त्यांच्या जाण्याने केवळ मराठी साहित्याचीच नव्हे, तर सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
- प्रा. डॉ. प्रमोद मुनघाटे, मराठी विभागप्रमुख, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
‘मागोवा’ गटातील महत्त्वाचे विचारक
- मराठी साहित्य विश्वाला भूषणावह ठरलेले प्रख्यात कादंबरीकार, प्रगतिशील, विवेकवादी, निर्भीड आणि वैज्ञानिक भूमिकेचे पुरस्कर्ते वैदर्भीय लेखक नंदा खरे यांच्या अकाली निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आहे. मराठी लेखन विश्वावर त्यांच्या लेखनाच्या वेगळ्या शैलीची आणि जीवन जाणिवेची अमीट छाप उमटलेली आहे. पुरस्कार नाकारण्याचे धाडस आणि नम्रता त्यांच्यात होती. सुधीर बेडेकर स्थापित ‘मागोवा’ गटातील ते एक महत्त्वाचे विचारक होते. त्यांच्या निधनाने मराठीने एक शैली संपन्न आणि जीवनाला बांधील असा पुरोगामी, सहिष्णू, विवेकी विचारवंत देखील गमावला आहे.
- डॉ. श्रीपाद जोशी, माजी अध्यक्ष, मराठी साहित्य महामंडळ
काळाच्या पुढचा विचार करणारे लेखक
- नंदा खरे हे काळाच्या पुढचा विचार करणारे लेखक होते, हे त्यांच्या ‘उद्या’ या कादंबरीवरून स्पष्टच होते. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन ठेवून मानवी जीवनाकडे पाहणारे ते महत्त्वाचे लेखक होते. रचनेपासून ते आशयातले वेगळेपण त्यांच्या चिंतनातून लेखनात उतरले आहे. साहित्य अकादमी पुरस्कार नाकारणारे नंदा खरे हे मराठीतील पहिले व एकमेव लेखक आहेत. त्यांच्या जाण्याने मराठीला नवी दृष्टी देणारा तर्कसंगत कादंबरीकार गेला, ही दु:खद घटना आहे.
- डॉ. रवींद्र शोभणे, कार्याध्यक्ष, विदर्भ साहित्य संघ
...............