नागपूर : ‘वेदांता-फॉक्सकॉन’बद्दल विरोधकांचे आरोप तर्कशून्य आहेत. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना ‘नॅनो’ प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता, तो गुजरातमध्ये गेला. तेव्हा आम्ही असे राजकारण केले नाही, असे सांगत मागच्या सरकारच्या उदासीनतेमुळे अनेक प्रकल्प बाहेर गेले आहेत, असा आरोप वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केला.
मुनगंटीवार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात राज्याच्या औद्योगिक विकासासाठी धोरण आखले जाणार आहे. आता तर ‘वेदांता’ने स्पष्ट केले आहे की ते महाराष्ट्रात गुंतवणूक करणार आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीस रशियाला गेले आहेत. ते आल्यावर यावर गंभीरतेने चर्चा होईल. उद्योग कुठेही जाणार नाही, असे मुनगंटीवार म्हणाले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे आता दुसरे मुद्दे नाही. गेले आठ महिने उद्योग महाराष्ट्रात लावण्याबाबत उद्योगपती चर्चा करत होते, तेव्हा वाटाघाटी होत होत्या. तेव्हा हे महाविकास आघाडी सरकार गंभीर नव्हते, असा आरोपही त्यांनी केला.