नागपूर : आधुनिक आणि स्मार्ट शिक्षणाचे आमिष दाखवून कोट्यवधीची वसुली करणाऱ्या नागपुरातील नारायणा ई-टेक्नो शाळेचा बनावटपणा लोकमतने उघडकीस आणला. या शाळेला मान्यताच नसल्यासंदर्भात शिक्षण विभागाकडे तक्रार आली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने शाळेची चौकशीही करण्यात आली होती. चौकशीचा अहवाल संबंधित अधिकाऱ्याने महापालिका व शिक्षण विभागाला सादर केला. पण शाळेवर कारवाईच झाली नाही.
वाठोडा येथील नारायणा ई-टेक्नो ही शाळा २०१९-२० या सत्रात सुरू झाली. सुत्रांच्या माहितीनुसार शाळेने नर्सरी ते सातवीपर्यंत ९०० विद्यार्थ्यांचे प्रवेश करवून घेतले. पालकांकडून ६० हजार ते ९० हजार रुपयांपर्यंत शैक्षणिक शुल्क वसूल केले. या शाळेतील विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती असमाधानकारक वाटल्याने एका पालकाने शाळेला शाळा सोडण्याचा दाखला मागितला. शाळेने त्या पालकाला शाळा सोडण्याचा दिलेला दाखला हा दुसऱ्याच शाळेचा होता आणि त्या दाखल्यावर दिलेला युडायस नंबर हा तिसऱ्याच शाळेचा होता. शाळेचा हा बोगसपणा लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर शिक्षण यंत्रणा खडबडून जागी झाली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नारायणा ई-टेक्नो शाळेला मान्यता नसल्यासंदर्भात एका व्यक्तीने शिक्षण विभागाला तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने शाळेची चौकशीही झाली होती. या चौकशीतही शाळेचा बोगसपणा उघडकीस आला होता. चौकशी अधिकाऱ्याने त्यासंदर्भातील अहवाल महापालिका प्रशासन व जिल्हा परिषद प्रशासनाला सादर केला होता. आता शाळेचा बोगसपणा उघडकीस आल्यानंतर शिक्षण विभाग सतर्क झाला आहे.
- या शाळेसंदर्भात आलेल्या तक्रारीवरून आम्ही शाळेची चौकशी केली आहे. शाळेवर नियमानुसार कारवाई होणार आहे.
चिंतामण वंजारी, शिक्षणाधिकारी, प्राथमिक
- संस्थेवर गुन्हाही दाखल होऊ शकतो
कुठल्याही संस्थेला महापालिकेच्या हद्दीत शाळा उभारायची असेल तर त्या संस्थेला महापालिकेच्या शिक्षण विभागाची परवानगी घ्यावी लागते. त्याचबरोबर जि.प.च्या शिक्षण विभागाकडून वर्ग सुरू करण्यासंदर्भात मान्यता घ्यावी लागते. पण या शाळेने मान्यताच घेतली नसल्यामुळे शिक्षणाधिकारी संस्थेवर पालकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करू शकतात. शाळेकडून नुकसान भरपाई सुद्धा वसूल करू शकतात, असे शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे.