नरेंद्र जिचकार काँग्रेसमधून बडतर्फ; शिस्तपालन समितीची ६ वर्षांसाठी कारवाई
By कमलेश वानखेडे | Published: January 6, 2024 07:07 PM2024-01-06T19:07:05+5:302024-01-06T19:07:17+5:30
यापूर्वी कारणेदाखवा नोटीस बजावली होती
नागपूर : प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्याहातून माईक हिसकावण्याचा प्रयत्न केल्यानंतर झालेल्या राडा प्रकरणी प्रदेश सचिव नरेंद्र जिचकार यांना काँग्रेस पक्षातून ६ वर्षांसाठी बडतर्फ करण्यात आले आहे. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने जिचकार यांच्यावर पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत त्यांचे प्राथमिक सदस्यही तात्काळ प्रभावाने काढून टाकले आहे. दरम्यान, या कारवाई विरोधात आपण कार्यकारणीला पत्र व्यवहार करून वस्तुस्थिती मांडू, अशी भूमिका जिचकार यांनी मांडली आहे.
१२ ऑक्टोबर २०२३ रोजी नागपूर येथे झालेल्या प्रदेश काँग्रेसच्या आढावा बैठकीत जिचकार यांनी आपल्याला बोलू देण्याचा आग्रह करीत आ. विकास ठाकरे यांच्या हातातील माईक हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे ठाकरे समर्थक संतापले व जिचकार यांच्याशी भिडले होते. या झटापटीत जिचकार यांचा शर्टही फाटला होता. विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या समक्ष हा प्रकार घडला होता. या गोंधळानंतर दोन्ही बाजुंनी आरोप प्रत्यारोप झाले होते. याची दखल घेत काँग्रेसच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जिचकार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
या नोटीसला जिचकार यांनी २३ ऑक्टोबर २०२३ रोजी उत्तर दिले. या उत्तराचा समितीने अभ्यास केला. आपण आपल्या पक्षविरोधी वर्तनाबद्दल व गैरवर्तणूकी बद्दल दिलेले उत्तर समितीला समाधानकारक वाटत नाही. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या घटनेतील शिस्तबद्ध नियम आणि मार्गदर्शक तत्वे या प्रकरणात लागू होतात, असे नमूद करीत पक्षविरोधी वक्तव्याची दखल घेत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून सहा वर्षांसाठी काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पत्र शनिवारी शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण, सदस्य डॉ. भालचंद्र मुनगेकर व उल्हास पवार यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले. दरम्यान, आपण काँग्रेसचा विचार सोडणार नाही. येत्या १४ जानेवारीला राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला उपस्थित राहून १५ जानेवारी पासून नागपुरात जन आशीर्वाद यात्रा घेऊन घरोघरी जाणार असल्याचे जिचकार यांनी सांगितले.
सुड बुध्दीने कारवाई: जिचकार
१२ ऑक्टोबरच्या बैठकीत प्रदेश अध्यक्षांसमोर पक्षाच्या पदाधिकारीवर गुंडाकडून आपल्यावर हल्ला चढवला गेला. नागपूर शहरात मागील दहा वर्षांपासून पक्ष संघटना रसातळाला जात असताना पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून उठवणे हा गुन्हा ठरवला जात असेल तर ही कारवाई सुड बुध्दीने आणि नकारात्मक भूमिकेने घेतली गेली आहे. मी पक्षाचे तब्बल १९ हजार ६२६ डिजिटल मेंबर केले आहेत. काॅग्रेस विचारधारेचा प्रचार, प्रसार करणारे कार्यक्रम राबविले. पण पक्षाने माझे म्हणणे न ऐकता माझ्या वरच कारवाई करणे हे आश्चर्यकारक असल्याचे नरेंद्र जिचकार यांनी सांगितले.