नागपूर : जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या नरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालकासाठी ३६ उमेदवारांचे भाग्य रविवारी मतपेटीत बंद झाले आहे.
नरखेड येथील नगर परिषद प्राथमिक शाळा क्र १ येथील मतदान केंद्रावर सकाळी संथ गतीने सुरू झालेल्या मतदानाने दुपारी १ वाजतानंतर गती घेतली. सेवासहकारी संस्था व ग्रामपंचायत गटात मतदान करण्याकरिता पुरुष-स्त्री मतदारांची लांब रांग लागल्याचे चित्र होते.
राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार व कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार डॉ. आशिष देशमुख या राजकीय विरोधकांचा गट निवडणुकीच्या निमित्ताने आमनेसामने आल्याने जिल्ह्याचे लक्ष नरखेड बाजार समितीच्या निकालाकडे लागले आहे.
रविवारी मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. नरखेड बाजार समितीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस (केदार गट) व शिवसेनेचे महाविकास आघाडी पॅनल तर कॉंग्रेस (डॉ.आशिष देशमुख गट) व भाजपाचे बळीराजा सहकार पॅनल यांच्यात थेट लढत झाली.
येथे सेवा सहकारी संस्था गटात ११ संचालकपदासाठी २२ उमेदवार रिंगणात होते. यासाठी ६२७ मतदारपैकी ५४७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. ग्रामपंचायत गटातून ४ संचालक निवडायचे आहेत. यासाठी ८ उमेदवार रिंगणात होते. तीत ६०७ मतदार असून ५९५ मतदान झाले. अडते व व्यापारी गटात २ संचालक निवडायचे आहे. यासाठी ४ उमेदवार रिंगणात होते. यात ८० पैकी ७१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. हमाल व मापारी गटात १ संचालकाची निवड होईल. यासाठी दोन उमेदवार रिंगणात होते. यात ३६ पैकी ३५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पारशिवनीचे सहायक निबंधक सहकारी संस्था पंकज वानखेडे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहे.
मतदानादरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी मतदान केंद्र परिसरात पोलीस निरीक्षक जयपालसिंह गिरासे यांच्या मार्गदर्शनात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सोमवारी सकाळी १० वाजता याच केंद्रावर मतमोजणीला सुरुवात होईल. दुपारी ३ वाजता कौल हाती यईल तर ५ पर्यंत अंतिम निकाल हाती येतील.