नरखेड : जानेवारी महिन्यापर्यंत नरखेड तालुका कोरोनामुक्त होता. त्यामुळे सर्व व्यवहार, बाजारपेठ, कार्यालयीन कामकाजा बरोबरच सामाजिक उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करणे सुरू झाले होते. त्याचाच परिणाम होऊन फेब्रुवारीपासून परत कोरोनाने तालुक्यात पकड घट्ट केल्यामुळे जिल्ह्यापेक्षा तालुक्याचा कोरोना संसर्गाचा दर १४.६१ टक्के झाला आहे. १ ते २५ फेब्रुवारीपर्यंत शहरासह ग्रामीण भागात १५५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १५५ पैकी ६७ रुग्ण शहरी भागातील आहेत. सावरगांव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत २० रुग्ण, मेढला प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत (१८), मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत (२०), जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ३३ रुग्णांची नोंद झाली आहे. १७ ते २५ फेब्रुवारीपर्यंत तालुक्यात १८५६ नागरिकांची आरटीपीसीआर टेस्ट तर ७२४ नागरिकांची रॅपिड अॅन्टिजन टेस्ट करण्यात आली आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण जास्त प्रमाणात आढळून येत असल्यामुळे जलालखेडा येथे तहसीलदार डी.जी. जाधव यांच्या उपस्थितीत बैठक झाली. तीत सभापती नीलिमा सतीश रेवतकर, उपसभापती वैभव दळवी, सरपंच, उपसरपंच उपस्थित होते. या बैठकीत गावात कोरोनाप्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन करण्यात आले.
नरखेड तालुक्याला कोरोनाचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 4:09 AM