मंगेेश व्यवहारे
नागपूर : महाकालीनगर झोपडपट्टीत लागलेल्या आगीने सारेच हादरले आहेत. एका क्षणात सारे काही स्वाहा करणारी ही आक्राळविक्राळ आग अनेकांचे सर्वस्व हिरावून गेली. यापूर्वीही शहरातील काही झोपडपट्ट्या आगीत सापडल्या आहेत. ही होरपळ कायम असली तरी झोपडपट्ट्यातील चित्र काही बदलेले नाही. ‘लोकमत’ने शहरातील चिखली आणि वनदेवीनगरच्या झोपडपट्टीचा आढावा घेतला. नजरेस पडली तेथील अवस्था ! दुचाकीही सहज जाणार नाही, इतक्या अरुंद गल्ल्या आणि घराघरांवरून लोंबलेल्या विद्युत तारा यामुळे झोपडपट्ट्या आगीच्या तोंडावर असल्याची जाणीव झाली. अनावधानाने एका घरात आग लागली तर अख्खी वस्ती वेढली जावी, अशी येथील अवस्था आहे; पण मात्र कुणाचेच नाही.
‘लोकमत’च्या चमूने पूर्व नागपुरातील चिखली झोपडपट्टी व वनदेवीनगर या झोपडपट्टीचा आढावा घेतला. चिखलीमध्ये ५००च्या जवळपास कुटुंब वास्तव्यास आहे, तर वनदेवीनगर झोपडपट्टीतही घरांची संख्या ४००च्या जवळपास आहे. बहुतांश घरे लाकूड आणि टीनाच्या पत्र्याची आहे. यापूर्वी चिखली झोपडपट्टीला पाच वेळा आग लागली आहे. त्यात रहिवाशांचा मृत्यूही झाला आहे. पण झोपडपट्ट्यांची परिस्थिती सुधारली नाही.
गल्ल्या तर एवढ्या निमुळत्या की दुचाकीही व्यवस्थित जाऊ शकत नाही ! झोपडपट्टीत पाण्याची प्रचंड समस्या आहे. टँकरदेखील पोहोचू शकत नाही. वीज प्रत्येकाच्या घरी आहे. विद्युत तारा घराघरांवरून गेल्या आहेत. झोपडपट्टीतील घराघरांवर टीनाचे छप्पर असले तरी टीव्ही, फ्रीजसारखी उपकरणे घराघरात आहे. घरोघरी गॅसच्या शेगड्या असल्या तरी किमती महागल्याने काही कुटुंब स्वयंपाकाला चुलीचा वापर करताहेत. धोका कायम तोंडावर आहे.
एका खांबावरून अनेकांचे कनेक्शन
झोपडपट्ट्यांमध्ये सिमेंटचे खांब उभारून लोकांना वीज कनेक्शन दिले आहे. एका एका खांबावर अनेकांचे कनेक्शन आहे. यामुळे खांबावर तारांचे जाळे दिसते. विजेच्या तार घराघरांवरून गेल्या आहेत. एखादा शॉटसर्किट झाला तरी आग लागून पसरू शकते.
बाहेर पडायलाही जागा नाही
झोपडपट्टीतील घरे एकमेकांना लागून, अगदी चिपकून आहेत. येण्या-जाण्यासाठी हातभर जागा सोडून लोकांनी झोपड्या उभारल्या. रस्तेच नाही. अपात्कालीन स्थितीत ॲम्ब्युलन्सही जाऊ शकणार नाही. आगीसारखी भीषण घटना घडल्यास लोकांना पळायलाही जागा नाही.
- २० वर्षांपासून आम्ही चिखली झोपडपट्टीत राहत आहोत. यापूर्वी झोपडपट्टीत आगीही लागल्या आणि अनेक झोपड्या जळाल्या, त्यात माणसं मेलीत; पण येथे राहणे आमचा नाइलाज आहे. आम्ही मतदार आहोत. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे.
- राकेश मिश्रा, रहिवासी
- झोपडपट्टीत राहणारा कामगारांचा वर्ग आहे. सकाळी कामाला निघून गेल्यावर रात्रीच घरी येतो. डोक्यावर छत असले तरी जीव धोक्यात आहे. आग लागल्यास काय अवस्था होईल याची भीती आम्हालाही आहे. पण आमचा नाइलाज आहे.
- पार्वती मुरकुटे, रहिवासी