नवी मुंबई : महामार्गावर झालेल्या अपघातामध्ये नेरूळमधील भीमाशंकर सोसायटीमधील दोन जण ठार व चार जखमी झाल्याने या परिसरात शोकाकुल वातावरण झाले आहे. ७५० सदनिकांमधील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली होती. तरुणांच्या मृत्यूने सर्वांच्याच डोळ्यातून अश्रू वाहत होते. शहरातील सर्वात मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये भीमाशंकरचा समावेश होतो. साडेसातशे सदनिका असूनही येथील सर्व जण एका कुटुंबाप्रमाणे रहात आहेत. लग्नावरून परत येत असताना सोसायटीमधील तरुणांच्या कारला अपघात झाला. यामध्ये दोन ठार व चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या वृत्ताने या परिसरावर शोककळा पसरली आहे. अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरली. तत्काळ नागरिकांनी भाताण बोगद्याजवळील घटनास्थळी धाव घेतली. अनेकांनी पोलीस स्टेशन व रुग्णालयात जावून विचारपूस सुरू केली. मृत्यू व जखमी झालेल्या तरुणांच्या पालकांचा आक्रोश पाहून इतर नागरिकांनाही अश्रू आवरले नाहीत.रात्री उशिरापर्यंत सोसायटीच्या आवारामध्ये शेकडो नागरिक एका जागेवर जमले होते. सर्वांशी मिळून मिसळून राहणाऱ्या मुलांवरच काळाने घाला घातल्याने सोसायटीमध्ये कोणीच जेवणही केले नाही. पालकांना कोणी व कसा धीर द्यायचा हा प्रश्न सर्वांना पडला होता. अपघातामध्ये नगरसेवक रवींद्र इथापे यांचा मुलगाही गंभीर जखमी झाल्याने या परिसरातील व शहरामधील नगरसेवक व इतर नागरिकांनीही या परिसरात हजेरी लावली होती. (प्रतिनिधी)
नासुप्रचा विकास संकल्प
By admin | Published: March 22, 2016 2:37 AM