नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासच्या जागेवर लेआऊट टाकून कुख्यात धापोडकर-कनौजिया टोळीने कोट्यवधींचे भूखंड परस्पर विकून टाकले. पोलीस, नासुप्र प्रशासनातील काहींशी संगनमत करून या टोळीने केलेल्या या गैरप्रकाराचा आता भंडाफोड झाल्यानंतर अशोक आनंदराव धापोडकर (वय ४७, रा. जागनाथ बुधवारी) तसेच राजू लीलवा कनौजिया (वय ४३, रा. नाईक तलाव, लालगंज) या दोघांविरुद्ध नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अनधिकृत जमिनीवर कब्जा करून बनावट कागदपत्रे तयार करायची आणि ती परस्पर विकून कोट्यवधी रुपये हडपायचे, अशी धापोडकर-कनौजिया टोळीची पद्धत असून, त्यांनी याप्रकारे अनेकांची फसवणूक केली आहे. सामान्य माणसाला खऱ्या आणि बनावट कागदपत्रांची माहिती होत नसल्यामुळे ते या टोळीच्या जाळ्यात अडकतात. मात्र प्रशासनातील अनेकांना या गैरप्रकाराची माहिती असूनही ते याकडे दुर्लक्ष करतात. या टोळीकडून मोठी मलाई मिळत असल्यामुळे पोलिसही तक्रारदारांना हुसकावून लावतात. त्यामुळे धापोडकर टोळी कमालीची निर्ढावली आहे. काहीच होत नाही, असा गैरसमज झाल्याने त्यांनी काही महिन्यांपूर्वी नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजा तरोडी खुर्द (ता. कामठी) येथील प.क्र. ४६/२ जुना, नवीन खसरा क्र. १५ ची एकूण ८.२५ एकर जमीन हेरली. ती साफसूफ करून त्यावर अनधिकृत लेआऊट टाकले. जाहिरातबाजीही केली अन् खोट्या कागदपत्राच्या आधारे अनेकांना हे भूखंड विकले. (प्रतिनिधी)विक्रीपत्रही झाले, अधिकाऱ्यांना कळलेच नाहीनासुप्रच्या मालकीची अर्थात शासकीय मालमत्ता असलेल्या या जमिनीवरील भूखंडांची एकदा नव्हे तर अनेकदा या टोळीने रजिस्ट्री (विक्री) केली. निबंधक, नासुप्र, महापालिका अन् पोलिसांच्या हे कसे लक्षात आले नाही, असा प्रश्न आहे. दरम्यान, या गैरप्रकाराचा बोभाटा झाल्यानंतर नासुप्रचे अभियंता संदीप मधुकर राऊत (वय २५) यांनी चौकशी करून पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर नंदनवन पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला.
नासुप्रची जमीन विकली
By admin | Published: October 02, 2015 7:43 AM