कोरोना चाचणीत २६ कर्मचारी पॉझिटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर सुधार प्रन्यास मुख्यालयातील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. बुधवारी ११ कर्मचारी पॉझिटिव्ह आले. मागील चार दिवसात २६ कर्मचारी व अधिकारी पॉझिटिव्ह आल्याने नासुप्र कार्यालय कोरोना हॉटस्पॉट ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे. कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या टेबलांचे सुरक्षित अंतर नसल्याने व नियमांचे काटेकोर पालन होत नसल्याने कर्मचारी पॉझिटिव्ह येत असल्याची माहिती आहे.
नासुप्र कार्यालयात ३०० ते ३५० कर्मचारी व अधिकारी आहेत. मंगळवारी ९४ कर्मचाऱ्यांची तर बुधवारी ५४ कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली. उर्वरित कर्मचाऱ्यांचीही चाचणी केली जाणार असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. काही विभागात कर्मचाऱ्यांचे टेबल एकमेकाला लागून आहेत. सुरक्षित अंतर नसल्याने संसर्ग वाढण्याचा धोका आहे. येथे बायोमेट्रिक पद्धतीने कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंदविली जाते. यामुळे कोरोना संक्रमणाचा धोका असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. संक्रमणाला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.