मनपाच सांभाळणार ४४ उद्याने : उद्यान विभागाचा सभागृहात प्रस्ताव
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात नासुप्रच्या मालमत्ता व गुंठेवारी विभाग महापालिकेकडे हस्तातंरित करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार गुंठेवारीसोबतच नासुप्रने ४४ उद्याने महापालिकेला हस्तांतरित केली होती. परंतु ही उद्याने तुम्हीच सांभाळा, असे मनपाने नासुप्रला कळविले होते. शहरातील उद्याने सांभाळण्याची जबाबदारी मनपाचीच असल्याने, ती परत घेण्याला नासुप्रने नकार दिला आहे.
नासुप्रच्या प्रस्तावाला मनपाचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंंढे यांनी मंजुरी दिली होती. परंतु महाविकास आघाडी सरकारने नासुप्रची पुनर्स्थापना केली. मनपाला हस्तांतरित करण्यात आलेला गुुंठेवारी विभाग पुन्हा नासुप्रकडे देण्याचा निर्णय घेतला. यामुळे नाराज झालेल्या मनपातील पदाधिकाऱ्यांनी नासुप्रची उद्याने परत करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र विकसित केलेल्या उद्यानांचा सांभाळ करण्याची जबाबदारी मनपाचीच असल्याचे सांगत, नासुप्र सभापतींनी मनपाचा प्रस्ताव नाकारला आहे. या उद्यानांची जबाबदारी स्वीकारण्याचा प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.
...
दोघांच्या वादात उद्यानांची दुर्दशा
लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या उद्यानांची दुरवस्था झाली आहे. त्यात नासुप्रने हस्तांतरित केलेल्या उद्यानांची देखभाल नसल्याने ती फिरण्याजोगी राहिलेली नाहीत. उद्यानात मोठ्या प्रमाणात गवत व झुडपे वाढल्याने ती फिरण्यासाठी की जनावरे चारण्यासाठी आहेत, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे. दुसरीकडे बिल मिळत नसल्याने कंत्राटदारांनी देखभाल बंद केल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
....
मनुष्यबळाचा अभाव
नासुप्रच्या उद्यान विभागात मनुष्यबळ नाही. मनपाच्या उद्यान विभागाचीही अशीच परिस्थिती आहे. ७० टक्के पदे रिक्त आहेत. यामुळे खासगीकरणातून वा लोकसहभागातून देखभाल करण्याचा प्रयत्न आहे. मनपाने लोकसहभागाच्या गोंडस नावाखाली मोठी उद्याने खासगी संस्थांना चालविण्यासाठी दिलेली आहेत. परंतु लहान उद्याने बेवारस आहेत.
...
शहरातील उद्याने - १८२
मनपाची उद्याने - १३१
नासुप्रची उद्याने - ५१
खासगी संस्थांना दिलेली - ६९