नागपूर : ‘बी.आर्क.’मध्ये (बॅचरल ऑफ आर्किटेक्चर) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मात्र काही कारणांमुळे मागील दोन संधी हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी परत एकदा परीक्षा घेण्यात येणार आहे. दरवर्षी ‘नाटा’च्या (नॅशनल अॅप्टीट्यूड टेस्ट फॉर आर्किटेक्चर) दोन परीक्षा घेण्यात येतात. मात्र कोरोनाची स्थिती पाहता यंदा कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरतर्फे तिसरी परीक्षा ३ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. यासाठी २२ ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.
नागपूर विभागातील १० महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्षाच्या ६३० जागा आहेत. प्रवेशासाठी ‘नाटा’च्या स्कोअरला फार महत्त्व आहे. २०२१-२२ या सत्रातील प्रवेशासाठी ‘नाटा’च्या दोन ऑनलाइन परीक्षा झाल्या आहेत. परंतु कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. तर बऱ्याच जणांना आणखी चांगला स्कोअर मिळवायचा आहे. या विद्यार्थ्यांची संधी हुकू नये यासाठी यंदा प्रथमच तिसऱ्यांदा ‘नाटा’चे आयोजन करण्यात आले आहे. एक विद्यार्थी वर्षातून दोनदाच ‘नाटा’ देऊ शकतो. ३ सप्टेंबर रोजी परीक्षा घेण्यात येणार असून, नागपूर व अमरावती या शहरातदेखील परीक्षा केंद्र राहणार आहे. या परीक्षेत विद्यार्थ्यांच्या अॅप्टीट्यूडवर भर देण्यात येतो.
महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज : २२ ऑगस्ट (रात्री ११.५९ पर्यंत)
शुल्क भरणा : २२ ऑगस्ट (रात्री ११.५९ पर्यंत)
सुधारणा : १६ ते २२ ऑगस्ट
ऑनलाइन प्रवेशपत्र : २९ ऑगस्ट
परीक्षा : ३ सप्टेंबर
निकाल : ८ सप्टेंबर