नागपूर : कोरोनाच्या काळात अतिदक्षता विभागातील तज्ज्ञ (इंटेंसिव्हिस्ट) डॉक्टरांची संघटना ‘सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसीन’च्या नागपूर शाखेतील डॉक्टरांनी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ‘इंडियन सोसायटी आॅफ क्रिटिकल केअर मेडिसीन’ने भारतभरातील ८७ शाखांमधून नागपूर शाखेची सर्वोत्कृष्ट शाखा म्हणून निवड केली.
नागपूर शाखेला सलग दुस-या वर्षी राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाला आहे. २०१९ ते २०२१ च्या कार्यकारिणीने दोन वर्षात इंटरनॅशनल क्रिटिकेअर अपडेटसारखी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली होती. नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भावपूर्वी आणि नंतरही विविध प्रशिक्षण कार्यक्रम आणि वेबिनार्स आयोजित करून तज्ज्ञांनी नव्या आजारावरील शस्त्रक्रिया व मार्गदर्शन केले. परिणामी, नागपुरात कोरोनाचे व्यवस्थापन करण्यासाठी विविध इस्पितळातील आयसीयू सज्ज होते. अधिक माहिती देताना ‘एससीसीएम’ नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. जयेश तिमाने म्हणाले की, नागपुरात ३०० हून अधिक इंटेंसिव्हिस्ट डॉक्टरांनी धोका पत्करून कोरोना काळात गंभीर रुग्णांना सेवा दिली. डॉ. इम्रान नुरमोहम्मद म्हणाले, कोविड काळात आयसीयूमधील रुग्णांवर केवळ उपचारच नव्हे तर त्यांना मानसिक आधारही दिला. डॉ. अनंतसिंग राजपूत म्हणाले, संघटनेने आयसीयूमधील कोव्हिड रुग्णांचे व्यवस्थापनावर वेळोवेळी मार्गदर्शन केल्याने रुग्णसेवेलाही याची मदत झाली. यात माजी अध्यक्ष डॉ. निखिल बालंखे, डॉ. निर्मल जयस्वाल, डॉ. राजन बारोकर, डॉ. दीपक जेसवानी, डॉ. आनंद डोंगरे, डॉ. गिरीश देशपांडे, डॉ. देवयानी बुचे यांचे विशेष सहकार्य मिळाले. अध्यक्ष डॉ. जयेश तिमाने, सचिव डॉ. इम्रान नुरमोहम्मद, डॉ. अनंतसिंग राजपूत, डॉ. सारंग क्षीरसागर, डॉ. अजय साखरे, डॉ. राकेश ढोके, डॉ. उत्कर्ष शाह, डॉ. चेतन शर्मा, डॉ. स्वप्ना खानजोडे यांच्या प्रयत्नामुळे नागपूर शाखेला उत्कृष्ट शाखेचा बहुमान मिळवून दिला.