- गोपालकृष्ण मांडवकर नागपूर : उदबत्ती तयार करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या बांबूची मागणी मोठी आहे. असे असले तरी यंदा देशातील बांबू उत्पादन फक्त १५० मेट्रिक टन आहे. त्यातुलनेत मागणी मात्र ६ ते ७ हजार मेट्रिक टनाची आहे. मागणी व उत्पादनाच्या असंतुलनामुळे बांबूची आयात करावी लागत आहे. यावर उपाय म्हणून बांबूचे उत्पादन देशातच वाढविण्याचा प्रयोग सरकारने हाती घेतला आहे. महाराष्ट्र बांबू विकास मंडळाच्या माध्यमातून सध्या राष्ट्रीय बांबू मिशन योजना राबविली जात आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना उपयुक्त प्रजातीही उपलब्ध करून दिल्या जात आहेत. आजवर चीन आणि व्हिएतनाममधून बांबूची आयात केली जायची. मात्र, चीनसोबत संबंध ताणले गेल्याने आयातीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे देशातच उत्पादन वाढविण्यासाठी अगरबत्तीसाठी उपयोगात येणारा ‘टुल्डा’ या प्रजातीचा बांबू देशातच विकसित केला जात असल्याचे मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक टी.एस.के रेड्डी यांनी सांगितले.
अगरबत्तीसाठी खास ‘टुल्डा’ बांबू‘टुल्डा’ या प्रजातीच्या बांबूचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या दोन पेरांमध्ये जवळपास एक फुटाचे अंतर असते. तसेच तो नरमही असतो. त्यामुळे अगरबत्तीच्या निर्मितीसाठी तो अधिक सोयीचा ठरतो. या प्रकारच्या बांबूचे उत्पादन चीन आणि व्हिएतनाम या देशांमध्येच मुबलक होते.
तीन वर्षांनंतर ‘टुल्डा’चे उत्पादन येईल हाती राज्यात सात उत्पादकांना अधिकृत पुरवठादार म्हणून जाहीर केले आहे. त्यांच्या रोपांचे दरही निश्चित करण्यात आले आहेत. राष्ट्रीय बांबू मिशनअंतर्गत जुलै-२०२० पासून आठ प्रकारचे बांबू कलम शेतकऱ्यांना पुरविण्यात आले आहेत. त्यात टुल्डाचाही समावेश आहे. तीन वर्षांनंतर त्याचे उत्पादन हाती येईल.