लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जनसंवादाच्या पद्धती व तंत्रामध्ये मागील काळापासून कमालीचा बदल दिसून येत आहे. हीच बाब लक्षात घेता केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने मुंबईच्या ‘फिल्मसिटी’जवळ ‘नॅशनल सेंटर ऑफ एक्सेलन्स फॉर अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग अॅन्ड कॉमिक्स’ सुरू करण्याबाबत घोषणा केली होती. यासंदर्भातील काम सुरू असून येथील ‘कॅम्पस’ २०२१ मध्ये सुरू होईल. हे केंद्र स्थापन करण्याची जबाबदारी ‘आयआयएमसी’कडे देण्यात आली असून आशियातील हे सर्वात मोठे केंद्र ठरेल, अशी माहिती संस्थेचे महासंचालक के.जी.सुरेश यांनी दिली.नागपूर प्रेस क्लब येथे आयोजित पत्रपरिषदेदरम्यान त्यांनी ही माहिती दिली. मुंबईच्या ‘फिल्मसिटी’त हे ‘नॅशनल सेंटर ऑफ एक्सेलन्स’ उभारण्यात येणार आहे व यासाठी महाराष्ट्र शासनाने २० एकर जमीनदेखील दिली आहे. अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग अॅन्ड कॉमिक्स या क्षेत्रांमध्ये प्रचंड रोजगार संधी आहेत. मात्र त्यातुलनेत दर्जेदार अभ्यासक्रम नाहीत. या केंद्रातून वर्षाला १६०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. ‘पीपीपी’ तत्त्वावर हे केंद्र उभारण्यात येणार असल्याचे के.जी.सुरेश यांनी सांगितले. पत्रपरिषदेला ‘आयआयएमसी’च्या अमरावती केंद्राचे विभागीय संचालक विजय सातोकर, ‘नागपूर प्रेस क्लब’चे अध्यक्ष प्रदीप मैत्र, जोसेफ राव हे उपस्थित होते.मराठी अभ्यासक्रमांची प्रवेशपरीक्षा आता पाच केंद्रांवर‘आयआयएमसी’ने भाषिक अभ्यासक्रमांवर गेल्या काही काळापासून भर दिला आहे. याअंतर्गत अमरावती येथेदेखील ‘आयआयएमसी’चे विभागीय केंद्र उघडण्यात आले आहे. येथे इंग्रजीसमवेत मराठी अभ्यासक्रमांचेदेखील धडे दिले जातात. मागील वर्षीपर्यंत मराठी अभ्यासक्रमांची प्रवेशपरीक्षा केवळ अमरावती येथेच होत होती. मात्र पुढील सत्रापासून ही परीक्षा अमरावतीसह नागपूर, मुंबई, पुणे, औरंगाबाद येथेदेखील घेण्यात येईल. महाराष्ट्रातील सर्व भागातील विद्यार्थ्यांना संधी मिळावी यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यासोबतच येथील प्रवेशक्षमता १५ वरून २५ करण्याचा प्रस्ताव असल्याचे के.जी.सुरेश यांनी सांगितले. बडनेरा येथे विभागीय केंद्राला १६ एकर जागा मिळाली असून येथे ‘कॅम्पस’ उभारणीचे काम लवकरच सुरू होईल व पुढील तीन वर्षांत ते पूर्ण करण्यात येईल, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.संस्कृत भाषेतदेखील पत्रकारितेचे धडे‘आयआयएमसी’ने संस्कृत भाषेकडेदेखील लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. संस्कृत भाषेत वर्तमानपत्रे कमी असली तरी संस्कृत भाषेत ‘ब्लॉग्ज’, ‘सोशल मीडिया’वरील ‘पेजेस’, संकेतस्थळ, ऑनलाईन बातम्यांचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे ‘आयआयएमसी’ने संस्कृत भाषेतदेखील पत्रकारितेचा पदविका अभ्यासक्रम सुरू केला आहे. लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाच्या सहकार्याने हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला असल्याची माहिती त्यांनी दिली. ‘आयआयएमसी’ला लवकच ‘डीम्ड’ विद्यापीठाचा दर्जा मिळेल. मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून ‘लेटर ऑफ इंटेन्ट’देखील मिळाले आहे. त्यामुळे येथे पदव्युत्तर अभ्यासक्रमदेखील सुरू करण्यात येतील, असेदेखील के.जी.सुरेश यांनी सांगितले.