लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाच वर्षाच्या रोहितला त्याच्या स्रायू आणि दोन्ही पायांच्या जोडांमध्ये हळूहळू कडकपणा वाढत गेल्याने चालण्यात अडचण येऊ लागली होती. त्याचे शाळेत जाणे बंद झाले. उंची आणि वजन वाढत असताना, त्याचे पालक त्याला शाळेत घेऊन जाण्यास असमर्थ होते. नागाई नारायणजी मेमोरिअल फाउंडेशन व चिल्ड्रेन ऑथोर्पेडिक केअर संस्थेच्या वैद्यकीय आणि पुनर्वसन संघाने शिबिरांदरम्यान त्याच्या पायावर विनाशुल्क शस्त्रक्रिया करून मदतीचा हात दिला. कित्येक महिन्यांच्या कठोर थेरपीनंतर रोहित घरी कमीतकमी आधार घेऊन चालतो. आता तो शाळेतही जाऊ लागला आहे. रोहितसारख्या तीन हजारावर सेरेब्रल पाल्सी ग्रस्त व हाडाची विकृती असलेल्या मुलांना सुंदर आयुष्य जगण्यास या संस्थेने मदत केली आहे. सेवेचे हे कार्य निरंतर सुरू आहे.जगभरातील प्रत्येक १००० मुलांमध्ये सेरेब्रल पाल्सीचे दोन ते तीन रुग्ण आढळून येतात. सेरेब्रल पाल्सी, जन्माच्या आधी किंवा नंतर नवजात मेंदूला होणाऱ्या आघाताने होतो. यामुळे स्रायूंमध्ये कडकपणा, हाडांची विकृती, शारीरिक संतुलनाची समस्या, खाणे, चालणे इत्यादी कामांमध्ये अडचणी येतात. अशा रुग्णांचा पालकांवर शारीरिक, आर्थिक व भावनिक बोजा पडतो. यामुळे काही पालक उपचारही थांबवितात. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन एनएनएमएफ व संस्थेने सेरेब्रल पाल्सी ग्रस्त मुले आणि त्यांच्या कुटुंबास ‘मल्टिडिसिपलिनरी टीम रिहॅबिलिटेशन’ सेवा देण्याचा प्रयत्न हाती घेतला आहे. ते वैद्यकीय सेवेसोबतच, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी आणि शस्त्रक्रिया आदी सर्व एकाच ठिकाणी आणि तेही विनामूल्य देत आहे. पेडियाट्रिक ऑथोर्पेडिक सर्जन डॉ. विराज शिंगाडे यांच्या अध्यक्षतेखाली ही संस्था ज्यांना सेरेब्रल पाल्सी आहे, विशेषकरून दुर्गम भागातील वंचित मुलांसाठी पुढाकार घेत आहे.महाराष्ट्रासह इतर राज्यातीलही बालकांवर उपचारडॉ. शिंगाडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, संस्थेच्यावतीने गेल्या १५ वर्षांपासून महाराष्ट्रासह, छत्तीसगड, ओरिसा, मध्य प्रदेशात जाऊन तिथे मोफत स्क्रीनिंग शिबिरे आयोजित केली जातात. या शिबिरांमधून आतापर्यंत १० हजारांवर आतापर्यंत सेरेब्रल पाल्सी असलेल्या मुलांची तपासणी करण्यात आली. यातील ज्या मुलांना वैद्यकीय सोयी मिळणे कठीण होते अशा ३००० हजारावर मुलांवर संस्थेतर्फे मोफत शस्त्रक्रियांद्वारे मदतीचा हात दिला. परिणामी, आत्मविश्वास हरवून बसलेली ही मुले आता स्वत:च्या हिमतीवर पुन्हा उभी राहू लागली आहेत.या डॉक्टरांचे योगदान महत्त्वपूर्णसंस्थेच्या या योगदानात डॉ. विराज शिंगाडे यांच्यासह बालरोग भूलतज्ज्ञ डॉ. रश्मी शिंगाडे, डॉ. दीपाली मंडलिक, डॉ. सुहास अंबादे, डॉ. मनीष ढोके, डॉ. संदीप मैत्रेय, न्यूरोतज्ज्ञ डॉ अमरजित वाघ, डॉ. विनीत वानखेडे व डॉ. दिनेश सरोज यांचा प्रामुख्याने सहभाग राहिला आहे.
राष्ट्रीय सेरेब्रल पाल्सी दिन : तीन हजारावर सेरेब्रल पाल्सी मुलांना दिले आयुष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2020 9:42 PM
National, Cerebral, Palsy, Day ,Health News नागाई नारायणजी मेमोरिअल फाउंडेशन व चिल्ड्रेन ऑथोर्पेडिक केअर या संस्थेने तीन हजारावर सेरेब्रल पाल्सी ग्रस्त व हाडाची विकृती असलेल्या मुलांना सुंदर आयुष्य जगण्यास मदत केली आहे.
ठळक मुद्देविनाशुल्क शस्त्रक्रिया करून दिला मदतीचा हात : एनएनएमएफ व चिल्ड्रेन ऑथोर्पेडिक केअर संस्थेचा पुढाकार