लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहर पोलिसांनी राबविलेल्या नागरीहिताच्या उपक्रमांची नॅशनल जिओग्राफी या जगविख्यात वाहिनीने (चॅनलने) दखल घेतली आहे. नागपूर पोलिसांच्या लोकोपयोगी उपक्रमांवर या वाहिनीने २१ मिनिटांची ही डॉक्युमेंट्री (माहितीपट) बनवून त्याचे आज शनिवारी देश-विदेशात प्रसारण केले. या प्रसारणानंतर नागपूर पोलीस देशभरातील पोलीस दलासाठी कौतुकाचा विषय ठरले आहेत.पोलिसांचे एकूणच वर्तन समाजमनाच्या नाराजीचा विषय असल्याने पोलिसांबद्दल खचितच चांगले ऐकायला मिळते. मात्र, नागपूर पोलिसांनी गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी आणि नागरिकांच्या मदतीसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. त्यात भरोसा सेल, बडी कॉप्स, ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणारा सेल यांचा विशेषत्वाने सर्वत्र उल्लेख होतो. या उपक्रमातून पोलिसांच्या मानवी संवेदना पुढे आल्या आहेत. याशिवाय भू-माफियाविरुद्ध पोलिसांनी कडक कारवाई करण्यासाठी एसआयटी स्थापन करून अनेकांना त्यांच्या कोट्यवधींच्या जमिनी परत करून दिल्या. भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी तसेच जर्मन जपान टोळीवर मोक्का लावला. त्याची या वृत्तवाहिनीने दखल घेतली. यासोबत नागपूरची एकूण संरचना आणि शहरातील वाहतूक व्यवस्था, पोलीस दलात रुजू होण्यापूर्वी पोलिसांना दिले जाणारे खडतर प्रशिक्षण आदींचाही या माहितीपटात सचित्र आढावा घेण्यात आला. हा माहितीपट नॅशनल जिओग्राफीने शनिवारी सायंकाळी ६ वाजता ‘इनसाईड नागपूर पोलीस ’ या नावाने प्रसारित केला. २१ मिनिटांच्या या माहितीपटाच्या प्रसारणानंतर देश-विदेशात नागपूर पोलीस दल कौतुकाचा विषय ठरले. अनेकांनी शहरातील पोलीस आयुक्तांपासून तो पोलीस कॉन्स्टेबलपर्यंत (सीपी टू पीसी) प्रत्येकाचे अभिनंदन केले.नागरिकांना धन्यवाद!यासंबंधाने पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी या कौतुकाचे श्रेय शहर पोलीस दलातील प्रत्येकाला आणि नागपूरकरांना दिले. सहआयुक्त, अतिरिक्त आयुक्त, सर्व पोलीस उपायुक्त आणि शहरातील सर्व पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावताना मानवी दृष्टिकोन समोर ठेवून काम करीत आहेत. त्याचमुळे नॅशनल जिओग्राफीसारख्या जगविख्यात वाहिनीने त्याची दखल घेतल्याचे डॉ. व्यंकटेशम यांनी म्हटले आहे.
नॅशनल जिओग्राफीने घेतली नागपूर पोलिसांची दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 1:19 AM
शहर पोलिसांनी राबविलेल्या नागरीहिताच्या उपक्रमांची नॅशनल जिओग्राफी या जगविख्यात वाहिनीने (चॅनलने) दखल घेतली आहे. नागपूर पोलिसांच्या लोकोपयोगी उपक्रमांवर या वाहिनीने २१ मिनिटांची ही डॉक्युमेंट्री (माहितीपट) बनवून त्याचे आज शनिवारी देश-विदेशात प्रसारण केले. या प्रसारणानंतर नागपूर पोलीस देशभरातील पोलीस दलासाठी कौतुकाचा विषय ठरले आहेत.
ठळक मुद्दे‘डॉक्युमेंट्री’चे प्रसारण : देश-विदेशात कौतुक