नागपूर : निसर्गाला, परमेश्वरालाच विविधता हवी आहे. म्हणूनच नाना रंगांची, विविध सुवासाची फुले व नानाविध चवीची फळे निसर्गानेच माणसाच्या पदरात टाकली. माणसाने ही विविधता धर्माचरणातही मान्य करायला हवी. धर्म एकच तो मानवतेचा. फरक आहे तो पंथ, संप्रदायांमध्ये, उपासना पद्धतीत. एकमेकांच्या श्रद्धांप्रति आदर बाळगून, हातात हात घालून पुढे गेलो, तरच भावी पिढ्या धर्मांधतेतून होणाऱ्या हिंसाचारापासून मुक्त होतील, अशा शब्दात जागतिक कीर्तीच्या आध्यात्मिक गुरूंनी रविवारी नागपूरमधून जगाला विश्वबंधुत्व व शांततेचा संदेश दिला.
‘लोकमत’ नागपूरच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित ‘धार्मिक सौहार्दाबाबत वैश्विक आव्हाने व भारताची भूमिका’ या विषयावरील राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेत बोलताना नागपुरातील कविवर्य सुरेश भट सभागृहातून सर्व धर्मगुरूंनी जगभरातील हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त केली. चार प्रमुख धर्मांचे उगमस्थान असलेला, हजारो वर्षे विविधतेतून सद्भाव जपणारा भारत सहिष्णुता व सौहार्दाच्या वाटेवर आधीच आध्यात्मिक विश्वगुरू आहे, असा निर्वाळा दिला.
या आंतरधर्मीय परिषदेला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे प्रमुख पाहुणे, तर महापौर दयाशंकर तिवारी हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. परिषदेदरम्यान ‘दी आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते गुरुदेव श्री श्री रविशंकर, हरिद्वार येथील पतंजली योगपीठाचे संस्थापक स्वामी रामदेव, बीएपीएस स्वामिनारायण संस्थेचे धर्मगुरू ब्रह्मविहारी स्वामी, नवी दिल्ली येथील अहिंसा विश्वभारतीचे संस्थापक आचार्य डॉ. लोकेश मुनी, मुंबईचे आर्चबिशप कार्डिनल ओस्वाल्ड ग्रेसियस, मुंबईच्या जीवनविद्द्या मिशनचे संस्थापक प्रल्हाद वामनराव पै, लेह-लद्दाख येथील महाबोधी आंतरराष्ट्रीय तपसाधना केंद्राचे संस्थापक भिक्खू संघसेना व अजमेर शरीफ दर्ग्याचे गद्दी नशिन हाजी सईद सलमान चिश्ती यांनी विचारअमृत मांडले. ‘लोकमत’ एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, ‘लोकमत’चे ‘एडिटर इन चीफ’ राजेंद्र दर्डा व समूह संपादक विजय बावीस्कर हेदेखील यावेळी उपस्थित होते.
निसर्गनियम कधीच बदलत नाही आणि तो बदलूही शकत नाही. तो धर्मातीत असून, क्रिया तशी प्रतिक्रिया होते, याचे भान राखून आणि त्याचे आत्मसात करून सामाजिक सौहार्द प्रस्थापित केले जाऊ शकते. परस्पर संवादासह इतर धर्मांचेही अस्तित्व मान्य करण्याचा दृष्टिकोन निर्माण करण्याची आवश्यकता आहे. परस्पर सामंजस्य तसेच अहिंसा व शांतीच्या भावनेतूनच धार्मिक सौहार्द व एकता प्रस्थापित होऊन जगाला बंधुत्वाची दिशा मिळेल, असा मान्यवर धर्माचार्यांचा सूर होता.विजय दर्डा यांनी प्रास्ताविकातून परिषदेच्या आयोजनामागील भूमिका मांडली. ‘लोकमत समाचार’चे संपादक विकास मिश्र यांनी संचालन केले, तर राजेंद्र दर्डा यांनी आभार मानले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘लोकमत’ समूहाचे दिवाळी विशेषांक ‘दीपोत्सव’ व ‘दीपभव’ यांचे प्रकाशन झाले.
ही धर्म परिषद म्हणजे विचारांचा कुंभमेळाच‘वसुधैव कुटुंबकम्’ ही आपल्या देशाची सनातन संस्कृती असून सर्वधर्मसमभावाच्या भावनेतूनच धार्मिक सौहार्द प्रस्थापित होऊन जगाला बंधुत्वाची दिशा मिळेल. देशाच्या हृदयस्थानी होणारी ही केवळ परिषद म्हणजे वैचारिक कुंभमेळाच असून येथे झालेल्या विचारअमृताचा सर्वत्र प्रसार व्हावा व समरसतेची ज्योत जगभरात जावी, अशी भावना सर्वांनी व्यक्त केली.
देश-विदेशातून आलेल्या धर्माचार्यांची मांदियाळीव्यस्त वेळापत्रक असूनदेखील सर्वच धर्माचार्य वेळात वेळ काढून देश-विदेशातून या परिषदेसाठी आले होते. ब्रह्मविहारी स्वामी अमेरिकेतून खास या परिषदेसाठी आले, तर स्वामी रामदेव अशक्यप्राय परिस्थिती असतानादेखील हरिद्वारहून आले. श्री श्री रविशंकर बंगळुरूहून, डॉ. लोकेश मुनी हे नवी दिल्लीहून, भिक्खू संघसेना थेट लडाखहून, तर हाजी सईद सलमान चिश्ती अजमेरहून आले. आर्चबिशप कार्डिनल ओस्वाल्ड ग्रेसियस व प्रल्हाद वामनराव पै हे मुंबईहून आले. ‘कोरोना’मुळे लागलेल्या ‘ब्रेक’नंतर प्रथमच ‘लोकमत’च्या माध्यमातून एकाच मंचावर इतक्या मोठ्या प्रमाणात धर्माचार्य एकत्रित आले व धर्माचार्यांची मांदियाळी अनुभवण्याची नागपूरकरांना संधी मिळाली.
सरसंघचालकांच्या परिषदेला शुभेच्छाराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. धर्म जोडणारा असतो. परंतु मनुष्याची बुद्धी नकारात्मक असली तर धर्माचा दुरुपयोग करून लोक समाजाला तोडण्याचे काम करतात. एकमेकांसमवेत परस्पर संवाद नसल्याने असे होते. आपण एकच आहोत याचे स्मरण समाजबांधवांना करून देण्याची आवश्यकता आहे, असे मत डॉ. भागवत यांनी व्यक्त केले.
विविधता हेच भारताचे वैशिष्ट्यधर्म लोकांना बांधून ठेवतो. मात्र त्याच्या नावाखाली विद्वेष निर्माण करण्याचे षडयंत्र काही लोक करतात. मात्र वैविध्यतेतच रस आहे व ईश्वर रसरूपी आहे, हे लक्षात ठेवायला हवे. विविधतेने बुद्धिमान लोक आनंदित होतात व मूर्ख एकमेकांशी लढतात. मानव जीवनात वैविध्यतेचा अंगीकार व्हायलाच हवा. सर्वधर्मसमभाव व विविधता हे भारताचे वैशिष्ट्यच आहे. विविध वाद, वैमनस्य यांचे निराकरण करणे हेदेखील धर्माचेच काम आहे. - श्री श्री रविशंकर
जगाला धार्मिक, आर्थिक व राजकीय दहशतवादापासून धोकाधार्मिक, आर्थिक, राजकीय व वैद्यकीय दहशतवादापासून जगाला सर्वात मोठा धोका आहे. सर्वधर्म नाही तर सर्वपंथ असे नाव असायला हवे. आम्ही सर्वांना हिंदू बनवू, मुस्लीम बनवू, ईसाई बनवू यापेक्षा आम्ही सर्वांना माणूस बनवू असे म्हटले पाहिजे. देश संविधानाने चालतो, तर समाज अध्यात्माच्या आधारे चालतो. सर्व जगातील धर्माचार्यांनी एकाच स्वरात, आम्ही सारे एक आहोत अशी भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. - स्वामी रामदेव
सामाजिक सौहार्दासाठी समाजाचे एकत्रित प्रयत्न हवेएककाळ होता जेव्हा चंद्रावर जाणे, अंतराळाची सहल हे स्वप्न वाटत होते. परंतु या गोष्टी प्रत्यक्षात आल्या. अनेकांना जगात सामाजिक सौहार्द नांदेल हे स्वप्न वाटते; परंतु निश्चित ते पूर्ण होईल हा विश्वास आहे. प्रेमाचा प्रसार, नियमांचे पालन व योग्य जीवनशैलीचा विकास यासाठी संपूर्ण समाजाने एकत्रित प्रयत्न केले, तर जागतिक सामाजिक सौहार्द प्रस्थापित केले जाऊ शकते. सामाजिक सौहार्दासाठी जगाकडून अपेक्षा करण्याऐवजी अगोदर स्वत:पासूनच सुरुवात केली पाहिजे.- ब्रह्मविहारी स्वामी
धर्माच्या विसंगतीपेक्षा समानतेकडे लक्ष केंद्रित कराधर्माच्या नावावर द्वेष पसरविला जात असताना जगाने परस्पर संवादासह इतर धर्मांचेही अस्तित्त्व मान्य करण्याचा दृष्टिकोन निर्माण करण्याची आवश्यकता आहे. वेगवेगळ्या धर्मांमध्ये ईश्वराची संकल्पना आणि काही विचारही वेगवेगळे आहेत, पण त्यांच्यामध्ये समानताही खूप आहेत. खुल्या मनाने आणि मेंदूने विचार केल्यास असे दिसेल की आपल्या सर्वांमध्ये विसंगतीपेक्षा समान दुवे अधिक आहेत. तेव्हा विसंगतीकडे लक्ष देण्यापेक्षा समानतेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.- कार्डिनल ओसवाल्ड ग्रेसिअस
माणुसकी हाच सर्व धर्मांचा आत्माएकमेकांना सुखी करण्याचा प्रयत्न, भावना हे भगवंताचे पूजन आहे. हीच मानवी संस्कृतीची मूल्ये आहेत आणि या मूल्यांचा संस्कार लहानपणापासूनच देणे गरजेचे आहे. समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता, कृतज्ञता, नीतीमूल्ये ही सर्व जीवनमूल्ये आहेत. ही मूल्ये रुजवावी लागतील आणि सामाजिक सौहार्दाचा विषय मार्गी लागेल. जीवनात माणुसकी अतिशय महत्त्वाची असून, माणुसकी हाच सर्व धर्माचा आत्मा आहे.- प्रल्हाद वामनराव पै
अहिंसा, शांतीसाठी भारताची मौलिक भूमिकासध्या जगात जे काही सुरू आहे ते विचलित करणारे, चिंता करायला लावणारे आहे. धार्मिक हिंसा, युद्धाची आक्रमकता, द्वेषभावना, भेदाभेद या गोष्टींनी जग बरबटले आहे. अशा स्थितीत जगाला अहिंसा, करुणा, शांतीचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आपण सर्वांनी एकत्रित येऊन जगात निर्माण झालेल्या समस्यांचे समाधान शोधण्याची योग्य वेळ आता आली आहे.- भिक्खू संघसेना
‘नियत’ सर्व धर्मांचा मुख्य पायातुम्ही कुठल्या भावनेने आपल्या ईश्वराची प्रार्थना करता हे महत्त्वाचे असते. एखाद्या व्यक्तीने नमाज अदा केली आणि त्यानंतर त्याने असे काही कृत्य केले की ते मानवजातीसाठी योग्य नाही, तर त्याने केलेली नमाज ही काहीही कामाची नाही. त्यामुळे ही नियतच सर्व धर्मांचा मुख्य पाया आहे. कोणत्याही धर्माच्या आस्थेला नुकसान पोहोचविणे हा सर्वांत मोठा गुन्हा आहे. असे लोक निश्चितपणे संपूर्ण मानवतेचे शत्रू आहेत.- हाजी सय्यद सलमान चिश्ती
सर्वांचा राष्ट्रधर्म एकच आपले कपडे वेगवेगळ्या रंगांचे आहेत. उपासना पद्धती वेगवेगळी आहे. संप्रदाय वेगवेगळे असू शकतात. धर्माच्या संकल्पना वेगवेगळ्या असू शकतात. परंतु, सर्वांचा भावार्थ एकच आहे. आपल्या सर्वांचा राष्ट्रधर्म एक आहे. हीच भारतीय संस्कृतीची खरी ताकद आहे. आपली संस्कृती कोणत्याही धर्माशी जुळलेली नाही. सर्वधर्मसमभाव हे आपले तत्त्व आहे. सर्वांचा सन्मान करणे हाच जीवनाचा दृष्टिकोन आहे. विविधतेत एकता हीच आपली विशेषता आहे.- नितीन गडकरी
‘लोकमत’ने धर्मनिरपेक्षतेचे संस्कार जपले‘लोकमत’ने पहिल्या दिवसापासूनच धर्मनिरपेक्षता जोपासली. सर्वधर्मसमभाव ही त्याची भूमिका राहिली. क्षमा व अहिंसा आमच्या हृदयात आहे. मानवतेहून मोठा धर्मच नाही व हे संस्कार आम्ही जपले. सर्व धर्म, पंथ यांचा आदर केला. भारताची भूमिका सर्वांत महत्त्वाची आहे. अनेक युगांपासून लोक एकत्रित नांदत असून, ‘वसुधैव कुटुंबकम्’ हा देशाचा संस्कार आहे. धर्माच्या नावावर सध्या जी परिस्थिती निर्माण झाली, त्या पार्श्वभूमीवर सामाजिक सौहार्दावर धर्माचार्यांचे मार्गदर्शन मौलिक आहे.- विजय दर्डा
शांती व सद्भावनेचा मार्गच जगाला तारू शकतोधर्म-पंथाच्या नावावर जगात हत्या होत असताना या समस्येच्या समाधानासाठी जग भारताकडे पाहत आहे. भगवान महावीर, तथागत बुद्ध, गुरु गोविंदसिंग, महात्मा गांधी यांनी दिलेल्या अहिंसेच्या विचारांचे आचरण करत असल्यामुळे जागतिक पातळीवर भारताची जबाबदारी वाढली आहे. शांती व सद्भावनेचा मार्गच जगाला तारू शकतो.- राजेंद्र दर्डा