नागपूर नागरिकच्या जागेवर अवयव प्रत्यारोपण रुग्णालय उभारावे, विशेष समितीची शिफारस
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: November 29, 2023 06:08 PM2023-11-29T18:08:07+5:302023-11-29T18:11:22+5:30
सरकारची हायकोर्टात माहिती
नागपूर : नागपूर नागरिक सहकारी रुग्णालयाच्या जमिनीवर अवयव प्रत्यारोपणासाठी समर्पित रुग्णालय उभारावे, अशी शिफारस पाच सदस्यांच्या विशेष समितीने राज्य सरकारला केली आहे. सरकारने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती दिली.
सहकारी रुग्णालय बंद पडल्यामुळे या जमिनीचा जनहितासाठी उपयोग व्हावा, यासाठी डॉ. बालचंद्र सुभेदार यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर बुधवारी न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, वरील शिफारसीकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले. याशिवाय, समितीने सहकारी रुग्णालयाच्या जीर्ण इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सांगितल्याचेही सरकारने नमूद केले. त्यानंतर न्यायालयाने हे मुद्दे रेकॉर्डवर घेऊन या प्रकरणावर येत्या ११ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी निश्चित केली.
सुभेदार यांची मागणी विचारात घेण्यासाठी संबंधित समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीमध्ये मेडिकल अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे संचालक डॉ. लोकेंद्र सिंग, झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन सेंटरच्या माजी अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, डॉ. श्रीकांत मुकेवार व डॉ. संजीव चौधरी यांचा समावेश आहे. या समितीने नुकतीच सहकारी रुग्णालयाला भेट देऊन सरकारला अहवाल सादर केला.