नागपूर : लोकमतचे संस्थापक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने बुधवारी अजनी इन्स्टिट्युट येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले. शिबिरात नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली.
शिबिराचे उद्घाटन अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनोज तिवारी, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक जय सिंह (तांत्रिक), रेल्वे रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंपक विश्वास, जीवन ज्योती ब्लड बँकेचे डॉ. रवि वानखेडे, डॉ. के. विनय, नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे विभागीय अध्यक्ष देबाशीष भट्टाचार्य, कोषाध्यक्ष नरेंद्र धानफुले, अजनी शाखा अध्यक्ष ई. व्ही. राव यांनी दीपप्रज्वलन करून केले. यावेळी बोलताना ‘एडीआरएम’ मनोज तिवारी यांनी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या सामाजिक कार्याची स्तुती करून लोकमतच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. ‘एडीआरएम’ जय सिंह यांनी रक्तदान हे श्रेष्ठदान असल्याचे सांगुन नॅशनल रेल्वे मजदूर युनियन आणि लोकमतने रक्तदान शिबिराचे आयोजन करून गरजू रुग्णांना दिलासा देण्याचे काम केल्याचे सांगितले. मुख्य वैद्यकीय अधीक्षक चंपक विश्वास यांनी कोरोनामुळे रक्ताची गरज वाढली असताना अशा प्रकारच्या रक्तदान शिबिरामुळे हजारो रुग्णांचे जीव वाचणार असल्याचे मत व्यक्त केले. डॉ. रवि वानखेडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री वेणु नायर यांच्या प्रेरणेमुळे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे संघटनेचे विभागीय अध्यक्ष देबाशीष भट्टाचार्य यांनी सांगितले. कार्यक्रमात कोरोनाकाळात नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या अजनी शाखेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या संघटनेच्या सदस्यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना कोरोना योद्धा अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. शिबिराच्या यशस्वितेसाठी अजय रगडे, मनोज गायकवाड, संजय थूल, राकेश ठवकर, टी. एस. जोस, विनोद सिंग, टीकाराम, शरद सागर, मारोती गुजर, सुनील डोंगरे, कशिश मोडक, इमरान खान, संदीप पाटील, माधुरी चौधरी यांनी सहकार्य केले. संचालन ई. व्ही. राव यांनी केले. आभार नरेंद्र धानफुले यांनी मानले.
.............