योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर लोकसभा मतदारसंघाची रचना १९५२ साली झाली. त्यानंतर लोकसंख्या व पर्यायाने मतदारांची संख्या सातत्याने वाढतच गेल्याचे दिसून आले. ६७ वर्षांमध्ये मतदारांची संख्या ही अठरा लाखांहून अधिक संख्येने वाढली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा या मतदारसंघाची मतदार संख्या २० लाखांच्या पार गेली, हे विशेष.
१९५२ साली झालेल्या पहिली सार्वत्रिक निवडणूक विदर्भ प्रदेश, मध्य प्रांत आणि बेरार प्रांत असताना झाल्या. त्यावेळी विदर्भात लोकसभेचे आठ मतदारसंघ होते. यातील नागपूर हा मोठ्या मतदारसंघांपैकी होता. यात नागपूरसह उमरेड व कामठी यांचादेखील समावेश होता. नागपूर लोकसभा क्षेत्राची एकूण मतदारसंख्या ही ३ लाख ५२ हजार ८७० इतकी होती. १९५७ साली मतदारसंख्येत केवळ २१ हजारांनी वाढ झाली होती. मात्र, त्यानंतर निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीची मोहीम व्यापक करण्यास सुरुवात केली. १९८४ मध्ये मतदारसंख्या ८ लाख ४५ हजार ८०५ इतकी होती. त्यानंतरच्या पाच वर्षांतच १९८९ मध्ये यात ३ लाख ३७ हजार ८६७ इतकी वाढ झाली व मतदारांची संख्या ११ लाख ८३ हजार ६७२ वर पोहोचली. मतदारसंघ रचनेच्या ३७ वर्षांनी मतदारसंख्या प्रथमच १० लाखांच्या पार गेली होती.
१९९६ मध्ये परत मतदारसंख्येत वाढ दिसून आली. १९९१ च्या तुलनेत मतदारांची संख्या २ लाख ७३ हजार ९५४ वाढली. १९९९ साली मतदारांचा आकडा १५ लाखांच्या वर गेला. २०१४ मध्ये नागपुरात १९ लाख ७८४ मतदार होते.
पाच वर्षांत दोन लाखांहून अधिक मतदार वाढले
२०१९ साली झालेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघाची मतदार संख्या २१ लाख ६१ हजार ९६ इतकी होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत १९ लाख ५३ हजार २६६ मतदार संख्या होती. पाचच वर्षांत २ लाख ७ हजार ८३० मतदारांची भर पडल्याचे दिसून आले.
वर्ष - एकूण मतदार
१९५२ - ३,५२,८७०
१९५७ - ३,७३,९३८
१९६२ - ४,९१,०००
१९६७ - ५,६६,९०४
१९७१ - ६,२१,६८९
१९७७ - ६,०८,९८१
१९८० - ७,५१,३१२
१९८४ - ८,४५,८०५
१९८९ - ११,८३,६७२
१९९१ - १२,४०,३८२
१९९६ - १५,१४,३३६
१९९८ - १५,२३,४२७
१९९९ - १५,५१,३८०
२००४ - १६,३०,८९४
२००९ - १७,३८,९२०
२०१४ - १९,००,७८४
२०१९ - २१,६१,०९६