लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरात गॅस सिलेंडर असल्यामुळे गरिबांना देण्यात येणारे रॉकेल बंद केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गांधीगिरी करीत अन्नधान्य वितरण अधिकारी यांना मोदक, मिठाई, शाल, श्रीफळ देऊन गांधीगिरी करण्यात आली.अन्नधान्य वितरण विभागाने १ आॅगस्ट २०१८ च्या शासन परिपत्रकाव्दारे गरीब जनतेचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न केला. हा निर्णय त्वरित मागे घ्यावा,या मागणीसाठी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वाखाली अन्नधान्य वितरण अधिकारी नागपूर शहर लीलाधर वार्डेकर यांना निवेदन देण्यात आले. गांधीगिरी आंदोलन करीत शासनाने काढलेले परिपत्रक जाळून निषेध करण्यात आला. या वेळी गजभिये यांनी सांगितले की, बीपीएल, एपीसीएल व अंत्योदय कार्डधारकांना दरमहा ४ लिटर रॉकेल वितरीत केले जाते. गरीब कुटुंबात घरचे सिलेंडर संपल्यावर केरोसिनचाही उपयोग केला जातो. मात्र १ आॅगस्ट २०१८ च्या शासन परिपत्रकाच्या अनुषंगाने बीपीएल, एपीएल व अंत्योदय कार्ड धारकांकडून त्यांच्याकडे सिलेंडर नसल्याचे लिखित हमीपत्र घेण्यात येणार आहे. ते हमीपत्र केरोसीन परवानाधारकांनी भरून घ्यावयाचे आहे. हा एकप्रकारे गोरगरीब जनतेवर आणि केरोसीन परवानाधारकांवर अन्यायच आहे. शासनाच्या परिपत्रकात केरोसीन परवानाधारकाने हमीपत्राची कामे करावी,असे कुठेच नमूद नाही, मात्र पुरवठा अधिकारी कार्डधारकांकडून गॅस सिलेंडर नसणेबाबत हमीपत्र भरून घेण्याचे काम करण्याकरिता केरोसीन परवानाधारकांवर प्रचंड दबाव टाकत असल्याचा आरोप आ. गजभिये यांनी यावेळी केला.आंदोलनात संजय पाटील, मोहनलाल शर्मा, अजय चौरे, निशांत इंदूरकर, सुधाकर जिचकार, मिलिंद सोनटक्के, मोहम्मद सलीम, रत्नमाला मेश्राम, लक्ष्मी शिंगाडे, पार्वता लोखंडे, आशा अंडरसहारे, सत्य विजय सहारे, श्रीधर खापर्डे, अरूण तिडके, नरेश सोमकुंवर, सोनू मेश्राम, नितेश वंजारी, प्रदीप उमरेठे, शकीलभाई, संतोष बांते, शेषराव शाहू, पराग बोरकर, पुरुषोत्तम बडगे, बाळू बिहारे, रितेश अग्रवाल, जयंती शर्मा, अशोक मेश्राम, राजू मेश्राम, अरुण तिडके, सूर्यकांत रंगारी, कुंदन उके, वीरेंद्र कोचे, संजय इंदूरकर, तिलक बोरकर, सचिन इंदूरकर, सुनीता खोब्रागडे, वर्षा डोंगरे, सरोज अंबादे आदींचा समावेश होता.
गरिबांच्या रॉकेलसाठी राष्ट्रवादीची गांधीगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 12:11 AM
घरात गॅस सिलेंडर असल्यामुळे गरिबांना देण्यात येणारे रॉकेल बंद केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गांधीगिरी करीत अन्नधान्य वितरण अधिकारी यांना मोदक, मिठाई, शाल, श्रीफळ देऊन गांधीगिरी करण्यात आली.
ठळक मुद्देअन्नधान्य वितरण अधिकाऱ्याला दिले मोदक, मिठाई : परिपत्रकाची केली होळी