नागपूर : राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे शिक्षणाचा स्तर आणि संशाेधनाच्या गुणवत्तेत सुधार करण्याचा दावा केला जात असला तरी त्या दाव्यातील फाेलपणा केंद्रीय शिक्षण व परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने जाहीर केलेल्या भारतातील उच्च शिक्षण संस्थांच्या मानांकनातून (एनआयआरएफ) दिसून आला. या मानांकनात राष्ट्रीय स्तराच्या २०० विद्यापीठांमधून नागपूर विद्यापीठाला १९६ वे स्थान मिळाले आहे. विद्यापीठ गेल्या वर्षीही याच स्थानावर हाेते.
मंत्रालयाकडून शिक्षण, शिक्षण आणि संसाधने, शोध आणि व्यावसायिक कार्यप्रणाली, पदवी परिणाम, संपर्क आणि समावेशिता, कल्पना या मापदंडांवर एकूण १३ श्रेणींमध्ये हे मानांकन देण्यात आले आहे. मंत्रालयाच्या या मानांकन यादीतील वेगवेगळ्या श्रेणीमध्ये नागपूर विभागातील काही संस्थांचे मानांकन सुधारले आणि काही श्रेणीत घसरले आहे. देशातील सर्वाेत्कृष्ठ समग्र संस्थांच्या यादीत विश्वेश्वरैया राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्था (व्हीएनआयटी) चे रॅंकिंग घसरले असून संस्थेला ८२ वे स्थान मिळाले आहे. संस्था गेल्या वर्षी ६८ व्या स्थानी हाेती. ८५० संस्थांच्या या यादीत डॉ.दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था- वर्धाला ७५ वे मानांकन मिळाले आहे. गेल्या वर्षी ही संस्था ९२ व्या स्थानी हाेती. अभियांत्रिकी संस्थांच्या यादीत व्हीएनआयटीला ४१ वे स्थान प्राप्त झाले आहे. देशातील ३० सर्वोत्कृष्ट वास्तुकला आणि नियोजन महाविद्यालयांमध्ये व्हीएनआयटीने १२ वा क्रमांक पटकाविला आहे.
मानांकनाच्या इतर श्रेणींमध्ये नागपूरच्या काही संस्थांचा समावेश आहे. व्यवस्थापन संस्थांना रँकिंगमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, नागपूरने ४३ वे स्थान प्राप्त केले आहे. गेल्या वर्षीही संस्था याच स्थानावर हाेती. महाविद्यालयाच्या रँकिंगमध्ये नागपूर येथील शासकीय विज्ञान संस्थेने ८३ व्या स्थानावर झेप घेतली आहे. नागपूर विद्यापीठासाठी दिलासादायक बाब म्हणजे औषधीशास्त्र अभ्यासक्रमाच्या यादीत विद्यापीठाच्या औषधीशास्त्र विभागाला ५१ वे स्थान मिळाले आहे.
या श्रेणीत कामठीस्थित किशाेरीताई भाेयर काॅलेज ऑफ फार्मसी ६८ व्या स्थानी आहे. गेल्या वर्षी ५३ वर हाेते. देशातल्या १०० सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था, वर्धा ३९ व्या स्थानी आहे. ही संस्था वैद्यकीय महाविद्यालयाच्या श्रेणीत २५ व्या स्थानी आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या रॅंकिंगमध्ये जी.एच.रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग हलक्या सुधारणेसह १६१ व्या स्थानी पाेहचले. श्री रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाची रॅंकिंग थाेडी घसरली आहे. दंत महाविद्यालयांच्या रॅकिंगमध्ये शासकीय दंत महाविद्यालय, नागपूर १५ व्या स्थानावर आहे. या यादीत दत्ता मेघे संस्थेने १७ वे स्थान प्राप्त केले आहे. यानंतर संशाेधन संस्था किंवा इतर काेणत्याही श्रेणीत नागपूर विभागातील संस्थांना स्थान मिळाले नाही.
अमरावतीचे शिवाजी विज्ञान महाविद्यालय १८९ वे
राष्ट्रीय संस्थांच्या मानांकनात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला स्थान मिळालेले नाही. मात्र अमरावतीच्या शिवाजी विज्ञान महाविद्यालयाला १८९ वे स्थान मिळाले आहे. संस्थेने एका रॅंकिंगची सुधारणा केली आहे.