लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशभरातील १० केंद्रीय ट्रेड युनियनने एकत्रित येऊन १२ सूत्री मागण्यांसाठी ८ जानेवारीला पुकारलेल्या देशव्यापी बंदला विविध कर्मचारी व कामगार संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. सीटूने नागपुरातून मोर्चा काढण्याचे आवाहन केले असून संविधान चौकात सर्व संघटनांच्या निषेध सभेचे आयोजनही करण्यात आले आहे. असे असले तरी स्वतंत्र विद्युत एम्लॉईज फेडरेशन आणि स्वतंत्र मजदूर युनियनने संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. कास्ट्राईब जि.प. कर्मचारी संघटनेने पाठिंबा दर्शवून काळ्या फिती लावून काम करण्याचे जाहीर केले आहे. तर कास्ट्राईब महासंघाने संपाला अटींसह समर्थन दिले आहे. एकंदर या संपाला मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेता शासकीय कामकाजावर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.केंद्र सरकारच्या आर्थिक आणि औद्योगिक धोरणांचा विरोध व्यक्त करण्यासाठी देशातील १० केंद्रीय ट्रेड युनियन संघटनांनी १५० च्या वर औद्योगिक कामगार फेडरेशन यांनी एकत्रित येऊन १२ सूत्री मागण्यांसाठी हे आवाहन केले होते. त्यानुसार अनेक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. मागील अनेक दिवसांपासून देशभरातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या सरकारकडे प्रलंबित आहेत. आश्वासने देऊनही मागण्या पूर्ण होत नसल्याने पुकारलेल्या या संपामध्ये अनेक संघटना सहभागी होत आहेत.नागपूर सीटूसोबत संलग्नित असलेल्या अंगणवाडी कर्मचारी, मेडिकल रिप्रेझेटेटिव्ह, कपास अनुसंधान केंद्र, निमवर्गीय कर्मचारी, नागपूर जनरल लेबर युनियन केम्सफिल्ड, मेटलॉक, अंकूर सिड्स, युनिज्युल्स, लाल बावटा, वाहतूक कामगार युनियन, स्पेसवूड कर्मचारी, महाराष्ट्र राज्य अभयारण्य गाईड्स युनियन, अभयारण्य जीप्सी चालक-मालक युनियन, लाल झेंडा कोल माईन्स मजदूर युनियन यांच्यासह ठेकेदार-कामगार यात सहभागी होत आहेत. खंडोबा मंदिर येथील सीटू कार्यालयातून सकाळी रॅली काढली जाणार असून तिचा समारोप संविधान चौकात सभेने होणार आहे.सीटू संलग्नील अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मधुकर भरणे यांनीही या संपात सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यानिमित्त निघणाºया मोर्चामध्ये नागपूर शहर व ग्रामीणसह भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस सहभागी होणार आहेत. कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा व किमान २१ हजार रुपये वेतन देण्याची त्यांची मुख्य मागणी आहे.समाजकल्याण कर्मचारी संघटना (गट क) यांनी प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी संपात सहभागी होण्याचा निर्णय घेल्याची माहिती विभागीय सचिव सुशील शिंदे यांनी दिली आहे.स्वतंत्र मजदूर युनियन संपाबाहेरया संपाचे नेतृत्व आरक्षणविरोधकांकडे असल्याचा आरोप करीत स्वतंत्र विद्युत एम्लॉईज फेडरेशन आणि स्वतंत्र मजदूर युनियनने संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. या फेडरेशनशी संबंधित २२ राज्यातील विविध कामगार संघटना यात सहभागी होणार नसून या सर्व राज्यातील १० लाख कर्मचारी संपापासून दूर राहणार असल्याचे मुख्य संघटन सचिव एन.बी. जारोंडे यांनी कळविले आहे.कास्ट्राईब जि.प. कर्मचारी संघटना काळ्या फिती लावून काम करणारकास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटननेने संपात सहभागी न होता पाठिंबा मात्र दिला आहे. संपाच्या दिवशी कर्मचारी काळ्या फिती लावून काम करतील, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोहम चवरे यांनी दिली आहे.कास्ट्राईब महासंघाचे अटींसह समर्थनमुंबईमध्ये झालेल्या बैठकीत ठरल्यानुसार, कास्ट्राईब महासंघाने अटींसह संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. महासंघाचे अध्यक्ष अरूण गाडे आणि महासचिव प्रभाकर जीवने यांनी ही माहिती दिली आहे.
देशव्यापी संपात अनेक संघटनांचा सहभाग, स्वतंत्र मजदूर युनियन संपाबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2020 11:19 PM
देशभरातील १० केंद्रीय ट्रेड युनियनने एकत्रित येऊन १२ सूत्री मागण्यांसाठी ८ जानेवारीला पुकारलेल्या देशव्यापी बंदला विविध कर्मचारी व कामगार संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
ठळक मुद्देसीटू मोर्चा काढणार : विविध संघटनांचा पाठिंबा, संविधान चौकात निषेध सभा, कार्यालये पडणार ओस