नागपूर : वन विभागाच्या सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण, वृक्षसंवर्धन आणि जलसंवर्धन या विषयाबद्दलची जिज्ञासा निर्माण व्हावी, त्यांना पर्यावरण संवर्धनाविषयाचे ज्ञान मिळावे तसेच वृक्षलागवड, पडीक जमीन विकास आणि जलसंवर्धन कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग वाढवा या उद्देशाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने निबंध लेखन, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. या जिल्हास्तरीय स्पर्धेतील प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या प्रवेशिकांचे राज्यस्तरावर परीक्षण करून त्यातून राज्यस्तरीय विजेत्यांची निवड केली जाणार आहे. याशिवाय राज्यस्तरावर सर्वांसाठी स्वतंत्र खुली छायाचित्र (फोटोग्राफी) स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतील प्राथमिक गटासाठी ‘नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन व संवर्धन’ हा विषय निश्चित करण्यात आला आहे. तसेच महाविद्यालयीन गटासाठी ‘मानव-वन्यजीव संघर्ष जबाबदार कोण?’ आणि चित्रकला स्पर्धेतील प्राथमिक गटासाठी ‘वनमहोत्सव माझे वृक्षारोपण’ असा विषय राहणार आहे. यातील छायाचित्र स्पर्धेत क्रेयान पेस्टल खडू, कलर पेन्सिल किंवा स्केचपेन या माध्यमातून छायाचित्र तयार करणे बंधनकारक राहील. तरी प्रत्येक शाळा-महाविद्यालय प्रमुखांनी प्रथम आपल्या स्तरावर निबंध आणि चित्रकला स्पर्धा घेऊन त्यातील प्रथम तीन क्रमांकाची चित्रे व निबंध शिफारशीसह संबंधित जिल्ह्याच्या उपसंचालक सामाजिक वनीकरण, वन विभाग यांच्याकडे १५ नोव्हेंबर २०१६ पर्यंत सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
वन विभागातर्फे निसर्ग संवर्धनासाठी उपक्रम
By admin | Published: October 30, 2016 2:42 AM