भिवापूर/चिचाळा : उमरेड-मांगरुळ-चिमूर राष्ट्रीय मार्गाचे काम बहुतांशी पूर्ण झाले असून कंत्राटदाराने मार्गाच्या दुतर्फा पाणी वाहून जाण्याकरिता नाल्यांची निर्मिती केली नाही. त्यामुळे गत दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावासाचे पाणी शेतात शिरले असून, पेरणी झालेल्या शेतांना तलावाचे रूप आले आहे. मालेवाडा, पाहमी, चिचाळा परिसरातील शेतकऱ्यांचे त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
उमरेड ते चिमूर या दुपदरी १०० कि.मी. राष्ट्रीय मार्गाचे गत दोन-तीन वर्षापासून सुरू असलेले काम बहुतांशी पूर्ण झालेले आहे. हा नवनिर्मित राष्ट्रीय मार्ग शेतशिवारापासून पाच ते आठ फूट उंच आहे. शिवाय गरडापार, मांगरुळ, पाहमी, चिचाळा, मालेवाडा ही गावेसुद्धा राष्ट्रीय मार्गाला लागून आहे. दरम्यान पाऊस आल्यानंतर परिसरासह मार्गावरील पाणी वाहून जाण्यासाठी नाल्यांची निर्मिती करण्यात आलेली नाही. त्यामुळे गत पावसाळ्यात पाहमी, चिचाळा, गरडापार शिवारातील राष्ट्रीय मार्गालगतच्या अनेक घरात आणि शेतात पाणी शिरून नुकसान झाले होते. दरम्यान येथील ग्रामस्थांनी मार्गाच्या दुतर्फा नाल्यांची निर्मिती करण्याची मागणी केली होती. परिणामी आंदोलनाची भाषा वापरणाऱ्या नागरिकांचा संताप लक्षात घेता कंत्राटदाराने एक-दोन ठिकाणी नाल्यांचे अर्धवट काम करून हात वर केले. यावर्षी पुन्हा तोच प्रसंग ओढावला आहे. गत दोन दिवसापासून तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान राष्ट्रीय मार्गाला लागून असलेले मालेवाडा येथील शेतकरी नारायण इंगोले, धनराज सातपुते, कवडू सातपुते, रामू लाखे, प्रशांत बारेकर, सूरज ढोरे, यशवंत ढोरे, आनंद सातपुते व चिचाळा येथील भागवत पडोळे, उमा शेंदरे, अभय पडोळे, शेखर कांडारकर, देवराव लाडस्कर, दशरथ गिरडे, विलास पडोळे आदी शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.
पेरलेले बियाणे गडप झाले
राष्ट्रीय मार्गाची निर्मिती करणाऱ्या संबंधित विभाग व कंत्राटदाराच्या नियोजनशून्य कामामुळे मालेवाडा, चिचाळा येथील शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी शिरले आहे. कोविडच्या संकटाशी लढा देत शेतकऱ्यांनी उधारवाड करून शेतात सोयाबीनची पेरणी, कपाशीची लागवड आणि धानाचे पऱ्हे टाकले. त्यांना अंकुर फुटण्यास सुरुवात झाली असताना पावसाचे पाणी शिरून शेतांना तलावाचे रूप आले आणि पेरलेले बियाणेसुद्धा गडप झाले.
--
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संबंधित कंत्राटदाराच्या दुर्लक्षित कारभारामुळे पावसाचे पाणी शेतात शिरून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याला संबंधित विभाग व कंत्राटदार दोषी आहेत. त्यामुळे चिचाळा व मालेवाडा येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी.
- गणेश इंगोले, शेतकरी रा. मालेवाडा.