लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यात दररोज सहा ते सात हजार रुग्णांची भर पडत आहे. शहरातील हॉस्पिटल फुल्ल झाले आहेत. ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने अनेकांचा जीव जात आहे. ऑक्सिजन बेड मिळावा, यासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक महापालिकेच्या वॉर रूमकडे गयावया करताहेत. साहेब, प्रकृती गंभीर आहे. ऑक्सिजन बेड उपलब्ध करा, नाही तर जीव जाईल, अशा विनवण्या करूनही अनेकांना बेड मिळत नाही.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ३ लाख ३६ हजार ३६८ झाली आहे. यात सध्या ७१ हजाार ६९२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. नागपूर शहरात २ लाख ४९ हजार ७१४ रुग्ण असून, सध्या अॅक्टिव्ह रुग्ण ४३ हजार ६५७ आहेत. कोरोना रुग्णांना उपचारासाठी मदत व्हावी, नागरिकांना लसीकरणाची माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी मनपा मुख्यालयात वॉर रूम सुरू करण्यात आली आहे. येथे दिवसभरात जवळपास ४०० ते ५०० कॉल येतात. गरजूंना हवी असलेली माहिती दिली जाते. काहींचे समाधान होते तर काहींचे होत नाही. मागणी करूनही ऑक्सिजन बेड उपलब्ध करता येत नाही. यामुळे वॉर रूममधील कर्मचाऱ्यांना अनेकदा रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या रोषाला सामोरे जावे लागते.
.....
२० जणांची वॉर रूम
शहरातील नागरिकांना लसीकरणाची माहिती उपलब्ध व्हावी, तसेच कोविड रुग्णांना उपचारासाठी मदत व्हावी, यासाठी महापालिकेने मुख्यालयात वॉर रूम सुरू केली आहे. येथे २० कर्मचारी कार्यरत आहेत. कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध व्हावा, तसेच गृहविलगीकरणातील रुग्णांना मार्गदर्शन केले जाते. त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जातो.
....
कुणाला ऑक्सिजन तर कुणाला हवे रेमडेसिविर
मागील काही दिवसात शहरातील रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. रुग्णालयात ऑक्सिजन बेड खाली नाही. त्यात रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची भटकंती सुरू आहे. वॉर रूमकडे चौकशी करून ऑक्सिजन बेड उपलब्ध करा, अशी मागणी केली जात आहे. रेमडेसिविर कुठे मिळेल याची माहिती विचारतात, पण पदरी निराशाच येत आहे.
....
मागणी पूर्ण होत नसल्याने निराशा
सध्या शहरातील हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नसल्याने वॉर रूमकडे मागणी करूनही ऑक्सिजन, व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाही. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची निराशा होते. संतप्त नातेवाईक कर्मचाऱ्यांना अपशब्दात बोलतात, पण दोघांचाही नाईलाज असतो.
....
रुग्णांना मदत करण्याचा प्रयत्न
कोविड रुग्णांना उपचार, लसीकरणाची माहिती वॉर रूमच्या माध्यमातून दिली जाते. गृहविलगीकरणातील रुग्णांना मदत केली जाते. डॉक्टरांचा सल्ला मिळावा यासाठी प्रयत्न केला जातो. कोणत्या हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध आहेत, याची माहिती दिली जाते. ही माहिती डॅशबोर्डवर देण्याचा प्रयत्न आहे.
नीरजा पठाणीया, अध्यक्ष, व्ही. सेव्हन फाऊंडेशन (वॉर रूम प्रमुख)