लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या आदेशानंतर बंद पडलेले निसर्ग पर्यटन अद्यापही सुरू झालेले नाही. मात्र या पर्यटनाला राज्यात मान्यता दिली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाऊन ३० जुलैपर्यंत वाढण्याचीही चर्चा सुरू आहे. त्यामुळे या काळात हे पर्यटन अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून वन पर्यटनावर बंदी घालण्यात आली आहे. मागील १०० दिवसाहून अधिक काळापासून राज्यातील अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्प कुलूपबंद आहेत. यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेकांचा रोजगार हिरावला आहे. टुरिस्ट गाईड, जिप्सी चालक , हॉटेल्स, स्थानिक उद्योगांना या बंदीचा तीन महिन्यापासून चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे विदर्भातील ताडोबा, पेंच व्याघ्र प्रकल्प व टिपेश्वर अभयारण्याजवळील या व्यावसायिकांनी आपल्या उपजीविकेचे कारण पुढे करून बफरमधील पर्यटनाला अनुमती देण्याची मागणी केली होती. शासनाचा खालावलेला महसूल, ग्रामस्थांच्या गरजा लक्षात घेऊन नियमांच्या अधीन राहून या पर्यटनाला मंजुरी देण्याचे जवळपास ठरले आहे. मध्य प्रदेशात १५ जूनपासून कोअरमध्ये वन पर्यटन सुरू झाले आहे. ताडोबा, अंधारी, टिपेश्वर, पेंचमध्ये बफरमधील पर्यटनाचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. पेंचसाठी आदेश मंगळवारी निघण्याची शक्यता आहे तर ताडोबासाठी परवानगी मिळाली आहे.दरम्यान, राज्यातील लॉकडाऊन ३० जुलैपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या काळात वाहतूक बंद असल्यावर पर्यटक येणार कसे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पर्यटकांचे बुकिंग ऑनस्पॉट होणार असल्याने त्यांना प्रवासासह बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागणार आहे.कोटींवर व्यवसाय बुडालावन पर्यटन बंद असल्याने विदर्भात कोटींवर रुपयांचा व्यवसाय बुडाला आहे. एकट्या ताडोबा, अंधारी व्याघ्र प्रकल्पात सव्वातीन कोटी रुपयांवर नुकसान झाले आहे. पेंच, मेळघाट, बोर, टिपेश्वर या सर्व ठिकाणचेही बुडालेले उत्पन्न कोटींच्या घरात आहे. त्याचा फटका या व्यवसायावर अवलंबून असलेल्या सर्वच घटकांना बसला आहे.बफरमधील निसर्ग पर्यटन सुरू करण्यासंदर्भात आदेश आले आहेत. शासनाच्या नियमांच्या अधीन राहूनच पर्यटनाला मान्यता दिली जाईल. पेंचसाठी मंगळवारी दुपारपर्यंत आदेश निघण्याची अपेक्षा आहे. जिल्हाधिकारी यांच्यास्तरावर मंजुरीसाठी पत्र गेले आहे.रविकिरण गोवेकर, मुख्य वनसंरक्षक व क्षेत्र संचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प
लॉकडाऊन वाढीच्या चर्चेमुळे निसर्ग पर्यटन अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 11:24 PM
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या आदेशानंतर बंद पडलेले निसर्ग पर्यटन अद्यापही सुरू झालेले नाही. मात्र या पर्यटनाला राज्यात मान्यता दिली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाऊन ३० जुलैपर्यंत वाढण्याचीही चर्चा सुरू आहे. त्यामुळे या काळात हे पर्यटन अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ठळक मुद्दे१ जुलैपासून बफरमध्ये पर्यटन : कडक निर्बंधात पर्यटक येणार कसे?