- योगेश पांडे नागपूर - नागपुरातील एका अभियंत्याने शेअर मार्केटमध्ये इंट्रा डे ट्रेडिंगच्या माध्यमातून दर महिन्याला पाच टक्के नफा देण्याचे आमिष दाखवत फसवणुकीचे मोठे रॅकेट रचले. त्याच्या जाळ्यात मध्य प्रदेशातील बालाघाटमधील शेकडो गुंतवणूकदार अडकले व आरोपीने त्यांना १७ कोटींहून अधिकच्या रकमेचा गंडा घातला. सात वर्ष गुंतवणूकदारांकडून पैसे घेतल्यावर आरोपीने पोबारा केला. या प्रकरणात नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रॉपर्टी डीलर विनोद माहुले (हरीओम नगर, बालाघाट) यांनी या प्रकरणात तक्रार केली आहे. आरोपी त्यांचाच मावस भाऊ प्रफुल्ल अनंतलाल दशरिया (४३, हिवरीनगर) हा आहे. तो मेकॅनिकल अभियंता असून पुण्याला नामांकित कंपनीत नोकरीला होता. २०१०-११ मध्ये तो परत आला व इंट्रा डे ट्रेडिंग करायला लागला. त्याचा मावसभाऊ तुषार वर्मा याने विनोदलादेखील यात पैसे गुंतवायला सांगितले. त्यांनी २०१६ मध्ये विनोद यांना १० लाख रुपये मागितले. मात्र विनोद यांनी पैसे नसल्याने दोन लाख रुपयेच गुंतविले. त्यावर प्रफुल्लने त्यांना महिन्याला २० हजार रुपये व्याज देण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी हळूहळू १३ लाख रुपये गुंतविले व आरोपी त्यांना महिन्याला ५२ हजारांचे व्याज देत होता. त्यामुळे त्यांचा विश्वास वाढला. प्रफुल्लने त्यांच्यासोबत करारदेखील केला. त्यात महिन्याला पाच टक्के व्याज देण्याची बाब नमूद होती. विनोद यांनी मित्रमंडळींना ही गोष्ट सांगितली व बालाघाट जिल्ह्यातील शंभराहून अधिक लोकांनी एकूण १७ कोटी ३६ लाख रुपये गुंतविले. काही काळाने गुंतवणूकदारांनी त्याला मुद्दल व व्याज मागितले असता तो फरार झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विनोद यांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अखेरीस नंदनवन पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी आरोपीविरोधात फसवणुकीचा तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील हितसंबंधाचे संरक्षण) अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
प्रफुल्लचा ‘माईंडफुल गेम’प्रफुल्लने इन्ट्रा डे ट्रेडिंग करत असताना माईंडफुल कन्सल्टन्सी स्थापन केली होती. त्याने नफ्याचे मोठमोठे आकडे दाखवून विनोद यांना प्रभावित केले होते. आपलाच भाऊ असल्याने विनोद यांनी त्याच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवला. तर विनोदला फायदा होत असल्याने बालाघाटमधील त्यांच्या मित्रमंडळींनीदेखील पैसे लावले. प्रफुल्लने सुरुवातीला फायदा दिल्याने कुणालाही शंका आली नाही. मात्र मोठी रक्कम जमा झाल्यावर आरोपीने त्यांचा विश्वासघात करत फसवणूक केली.