लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती नियामक मंडळाची निवडणूक ४ मार्च रोजी पार पाडली. मध्यरात्री उशिरापर्यंत झालेल्या मतमोजणीत अखेर प्रस्थापित उमेदवारांनीच बाजी मारली. २०१८-२०२३ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी नागपुरातून तीन जागांकरिता सात उमेदवार रिंगणात होते. ही निवडणूक २५ आॅक्टोबर २०१७ पासून अमलात आलेल्या नवीन घटनेप्रमाणे झाली. यंदा पहिल्यांदाच नागपुरातील रंगकर्मी गुप्त मतदान करणार असल्याने या निवडणुकीत कोण बाजी मारतो, याकडे शहरातील नाट्य विश्वाचे लक्ष लागले होते. रंगकर्मीचे प्रतिनिधित्व करणाºया महानगर व नागपूर अशा दोन्ही शाखांचे सदस्य मैदानात होते. यामध्ये रंगसेवक पॅनलचे अनिल चनाखेकर, सलीम शेख तर नागपूर शाखेचे नरेश गडेकर, शेखर बेंद्रे, प्रमोद भुसारी यांच्याशिवाय दिलीप देवरणकर व दिलीप ठाणेकर हे स्वतंत्र उमेदवारसुद्धा मध्यवर्तीत जाण्यास उत्सुक होते. यापैकी नागपूर शाखेचे नरेश गडेकर, शेखर बेंद्रे, प्रमोद भुसारी विजयी झाले आहेत. गडेकर यांना दोन्ही फेºयाअंती ४०१, बेंद्रे यांना ३६९ तर भुसारी यांना ४१२ इतकी मते मिळाली. सलीम शेख यांना १७६ तर चनाखेकर यांना २०३ मते मिळाली. या दोघांचा मतांचा आकडा बराच बोलका आहे. दिलीप देवरणकर व दिलीप ठाणेकर यांना अनुक्रमे १११ व २८ मते मिळाली. विजयी उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा ७ मार्च रोजी मुंबईच्या केंद्रीय कार्यालयात होणार आहे.
नाट्य परिषद निवडणूक : 'मध्यवर्ती'च्या मैदानात प्रस्थापितांचाच झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 10:22 PM
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती नियामक मंडळाची निवडणूक ४ मार्च रोजी पार पाडली. मध्यरात्री उशिरापर्यंत झालेल्या मतमोजणीत अखेर प्रस्थापित उमेदवारांनीच बाजी मारली.
ठळक मुद्देचनाखेकर, शेख यांनीही मिळवली लक्षवेधी मते