नागपूर : अभिव्यक्तीचे निकष हे सर्वत्र सारखे नसतात. श्रीमंत शाळांतील मुलांसाठी अत्याधुनिक शिक्षणाच्या पद्धतींसोबतच क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक, पर्यावरणीय आदी अनेक उपक्रम असतात. महानगर पालिकेच्या शाळांत शिकणारी तळागाळातील मुले ही त्यापासून अलिप्त असतात. कारण, शिक्षणाच्या प्रवाहातच ते येतात, हिच मोठी बाब असते. अशा शाळांतील मुलांच्या अभिव्यक्तीला मुक्त करण्याच्या धोरणातून ‘शालेय रंगमंच’ या उप्रकमाअंतर्गत नाट्यमहोत्सव पार पडला.
मेराकी परफॉर्मिंग आर्ट्स ऑर्गनायझेशनच्या वतीने ‘शालेय रंगमंच’च्या अंतर्गत नागपूर महानगर पालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी विशेष नाट्यकार्यशाळेचे आयोजन केले होते. अशा तऱ्हेचा हा पहिलाच प्रयत्न होता. या कार्यशाळेतून मनपाच्या विद्यार्थ्यांनी नाटक म्हणजे काय, ते कसे सादर केले जाते आणि त्याचे महत्त्व जाणून घेतले. कार्यशाळेतून तिन नाटकांचे सादरीकरण गांधीबाग, नंगा पुतळा चौक येथील पन्नालाल देवडिया हिंदी माध्यमिक शालेच्या सभागृहात करण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक मोहन करणकर उपस्थित होते.
महोत्सवात डॉ. राम मनोहर लोहिया माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मुन्शी प्रेमचंद यांच्या कथेवर आधारित कृष्ण लाटा दिग्दर्शित ‘ताई’, हंसापुरी हिंदी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी भारतरत्न भार्गव लिखित व निकिता ढाकूलकर दिग्दर्शित ‘शास्त्र देखो शास्त्र’ व पन्नालाल देवडिया हिंदी मीडियम शाळेच्या विद्यार्थ्यांनी असगर वजाहत लिखित व पुष्पक भट दिग्दर्शित ‘हड्डी’ या नाटकांचे सादरीकरण केले. संचालन शाळेतीलच विद्यार्थिनी बिनिता हिने केले. प्रास्ताविक अश्लेश जामरे यांनी केले. आभार कार्यशाळेच्या संचालिका मंगल सानप यांनी मानले.