अंकिता देशकर
नागपूर : माझे आजोबा पं. वसंतराव देशपांडे यांच्या केवळ सांगीतिक पैलूविषयीच सगळे परिचित आहेत. नाट्यसंगीताहूनही त्यांचे अनेक पैलू आहेत आणि ते सगळे पैलू ‘मी वसंतराव’ या चित्रपटातून उलगडण्याचा प्रयत्न झाला असल्याचे प्रख्यात शास्त्रीय गायक व अभिनेता राहुल देशपांडे यांनी सांगितले. नागपूरला एका संगीत मैफिलीसाठी आले असताना त्यांनी लोकमतशी संवाद साधला. त्यात त्यांनी वसंतरावांवरील बायोपिक, राज्यातील सांस्कृतिक परिस्थती आणि नागपूरबद्दलचे विचार व्यक्त केले.
मराठी अल्बमच्या तयारीत असताना निपुण धर्माधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ‘मी वसंतराव’ हा बायोपिक आकाराला आला आहे. २०१३ मध्ये चित्रपट बनविण्याचा निर्णय घेतला आणि सात वर्षांनंतर हा चित्रपट तयार झाला. आता तो थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. मी लहान असतानाच आजोबा गेल्याने, त्यांच्याविषयीच्या ठोस अशा आठवणी नाहीत. मात्र, मला संगीत शिकविण्याची आजोबांची इच्छा असल्याचे आजीने सांगितले होते. तेव्हापासून बारा वर्षे दररोज आठ तास त्यांच्या फोटोसमोर संगीत साधना केली आहे. जेव्हा मी त्यांची पडद्यावर त्यांची भूमिका साकारली तेव्हा ते माझे आजोबा नसून एक पात्र होते.
कोरोना महामारीत कलावंत हे शासनाच्या सर्वात शेवटच्या प्राधान्यात येत असल्याचे बघून दु:ख होते. सर्वत्र सगळेच सुरळीत सुरू असताना कलाकारांवर निर्बंध कायम राहिले. आता कलावंतांची गाडी रुळावर येत आहे. कलाकारही तांत्रिकदृष्ट्या विकसित होत आहेत, ही चांगली बाब आहे. माझे आजोबा अमरावतीचे होते आणि त्यांचे संपूर्ण बालपण नागपुरात गेले. त्यामुळे नागपूरविषयी प्रचंड आत्मीयता असल्याची भावना राहुल देशपांडे यांनी व्यक्त केली.