नागपूर : राणा दाम्पत्याचे पावने एक वाजता नागपूर विमानतळावर आगमन झाले. विमानतळावरून ते रामनगर परिसरातील मारुती मंदिरात पोहोचले असून हनुमान आरतीला सुरुवात झाली आहे. तत्पूर्वी, विमानतळावर राणा दाम्पत्याचे समर्थकांकडून स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना राज्य सरकारवर जोरदार टीका केली. तसेच, मंदिरात हनुमान चालीसा पठण करणार म्हटल्यावर आम्हाला नागपूर विमानतळावर अडवण्यात आल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला.
महाराष्ट्रात राम, हनुमान आणि हनुमान चालीसासाठी एवढा विरोध का होत आहे हे कळत नाही. दिल्लीत आम्ही हनुमान चालीसा पठण केलं, रॅली काढली त्यावेळी तिथे सुरक्षा व्यवस्था होती, तिथे काही त्रास झाला नाही. पण, ३६ दिवसांनंतर जेव्हा आपण राज्यात येतो आणि देवाचे दर्शन घेण्यासाठी जातो, तेव्हा इतका विरोध का? उद्धव ठाकरेंना दुसरं काम नाहीये का? आज शनिवार आहे, महाराष्ट्राला लागलेला हा शनी दूर झाला पाहिजे आणि त्यासाठी मी दर दिवशी हनुमान चालीसा आणि आराधना करेन, असे नवनीत राणा म्हणाल्या. राज्यावरील संकट टळावे यासाठीच आज आम्ही नागपुरात हनुमान चालीसाचे पठण करत आहोत, असेही राणांनी सांगितलं.
तर, रवी राणा यांनी आम्ही महाराष्ट्रात पाय ठेवताच मुख्यमंत्र्यांची झोप उडते, म्हणून हनुमान चालीसा पठणला विरोध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांची फौज इथे उभी केली आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले. तसेच, येत्या काळात हनुमान भक्त आणि राम भक्त मुख्यमंत्र्यांना धडा शिकवतील. महाराष्ट्रात आलेलं संकट आम्हाला दूर करायचं आहे, असेही रवी राणा म्हणाले.
दरम्यान, राणा दाम्पत्य रामनगर येथील हनुमान मंदिरात पोहोचले आहेत. पोलिसांनी सुरक्षिततेसाठी परिसरात कडेकोट बंदोबस्त केलाय. पोलिसांनी राणा यांच्या स्वागतासाठी वाजत असलेला ढोल ताशा बंद केला. मंदिरात हनुमान आरतीला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांना या परिसरातून आधीच दूर पाठवण्यात आले आहे. संपूर्ण चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे लागले आहेत.