लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ३९ कोटींचा अपहार करून नवोदय बँकेला बुडविणाऱ्या संचालक मंडळातील आरोपी संचालक विजय रामभाऊ बाभरे (वय ५९, रा. सिरसपेठ) यांना गुन्हे शाखेच्या आर्थिक सेलने (ईओडब्ल्यू) अटक केली. त्याला आज न्यायालयात हजर करून त्याचा २१ सप्टेंबरपर्यंत पीसीआर मिळविण्यात आला. कुख्यात बिल्डर हेमंत झाम, त्याचा साथीदार यौवन गंभीर यांना अटक केल्यानंतर तिसऱ्या दिवशी बाभरेला अटक करून पोलिसांनी नवोदय बँक घोटाळ्याच्या तपासाला गती दिल्याचे स्पष्ट केले आहे.महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष असलेले विजय बाभरे नवोदय बँकेत संचालक आहेत. ते बँकेच्या कर्ज उपसमिती आणि एकमुस्त सवलत (वन टाईम सेटलमेंट) समितीचेदेखिल सदस्य होते. त्यांनी कर्ज उपसमितीच्या बैठकीमध्ये अनेक डिफॉल्टर कर्जदारांना कर्ज मंजूर करण्यास मदत केली. त्यांनी १५ विलफूल डिफॉल्टर कर्जदारांना बँकेच्या एकमुस्त सवलत योजनेचा बेकायदेशीर लाभ पोहचवला. हे करताना बाभरे यांनी बँकेच्या ठेवीदारांचे ३८ कोटी, ७५ लाख, २०, ६४१ रुपयांचे नुकसान करून बँक बुडविण्याला हातभार लावला. लेखा परीक्षण अहवालानंतर पोलिसांनी धंतोली ठाण्यात या प्रकरणी बँकेचे अध्यक्ष अशोक धवड, मुख्य कार्यपालन अधिकारी संजय नाईक, बँकेचे संचालक विजय बाभरे यांच्यासह अनेकांवर गुन्हे दाखल केले आहे. तेव्हापासून ही मंडळी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. त्यांच्या घरावर पोलिसांनी पाळत ठेवली आहे. बाभरे सोमवारी रात्री त्यांच्या घरी परतल्याचे पोलिसांना कळले. त्यामुळे पहाटेच्या वेळी गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाची चमू बाभरेंच्या घरी धडकली. त्यांनी बाभरेंना अटक करून मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर केले. न्यायालयातून बाभरेंचा २१ सप्टेंबरपर्यंत पीसीआर मिळविण्यात आला. पुढील तपास ईओडब्ल्यूच्या उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत माने करीत आहेत.लोकमतच्या वृत्त खरे ठरले !नवोदय बँकेला बुडविणारा तसेच हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये गिळंकृत करणारा कुख्यात बिल्डर हेमंत झाम आणि त्याचा साथीदार यौवन गंभीर या दोघांच्या निवासस्थानाची पोलिसांनी आज झाडाझडती घेतली. त्यांच्याकडून महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. या दोघांनी कोट्यवधी रुपये कुठे दडवून ठेवले ते कळायला मार्ग नाही. दरम्यान, झाम- गंभीरनंतर त्यांचे साथीदार पोलिसांच्या टप्प्यात आले असून, काहींना लवकरच अटक केली जाणार असल्याचे वृत्त लोकमतने सोमवारच्या अंकात ठळकपणे प्रकाशित केले होते. बाभरेंच्या अटकेमुळे हे वृत्त खरे ठरले आहे.
नवोदय बँकेचे संचालक बाभरेंना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 12:34 AM
३९ कोटींचा अपहार करून नवोदय बँकेला बुडविणाऱ्या संचालक मंडळातील आरोपी संचालक विजय रामभाऊ बाभरे (वय ५९, रा. सिरसपेठ) यांना गुन्हे शाखेच्या आर्थिक सेलने (ईओडब्ल्यू) अटक केली.
ठळक मुद्देविलफूल डिफॉल्टर कर्जदारांना मदत : पोलिसांची होती घरावर पाळत