सोपान पांढरीपांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवोदय अर्बन बँकेचे अध्यक्ष अशोक धवड यांच्या अनागोंदी कारभारामुळे बँकेचे एकूण ६१.५२ कोटींचे कर्ज थकीत झाले आहे व त्यामुळे बँक आर्थिक संकटात आहे असा निष्कर्ष जिल्हा विशेष लेखापरीक्षक श्रीकांत सुपे यांनी नवोदय बँकेच्या विशेष अंकेक्षण अहवालात नोंदवला आहे.लोकमतजवळ हा ३६४ पानांचा अहवाल पोहचला आहे. त्यात धवड यांनी मनमानीप्रमाणे अग्रिम रकमा उचलल्या पण परत केल्या नाही. बँकेकडून स्वत:च्या नवोदय शिक्षण संस्थेसाठी अपुऱ्या तारणावर कर्ज घेणे, याशिवाय कर्जदारांशी संगनमत करून कोट्यवधीची कर्जे माफ करणे, बनावट रोकड वही तयार करून त्यात खोटी कर्जफेड झाल्याचे दाखवणे, कर्ज थकित असताना गहाणखत परत करणे असे गंभीर आरोप केले आहेत. याचबरोबर रिझर्व्ह बँकेचे नियम डावलून बेकायदेशीर कामे करण्यासाठी स्वत:च्या कर्मचाऱ्यांना धाकदपटशा दाखवून हवे ते काम करवून घेणे असेही आरोप आहेत.सर्वात गंभीर आरोप धवड यांनी ४ एप्रिल २०१४ ते २७ मार्च २०१५ या एका वर्षात बँकेतून २९ वेळा ५००० ते ६५ लाख अशा अग्रिम रकमा उचलल्याचा आहे. या प्रकरणात धवड यांनी २.१९ कोटी बँकेतून काढून घेतले पण परत केले नाही. सर्व व्हाऊचर्सवर धवड यांची व बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक राजेश बांते यांच्या सह्या आहेत. दि. ४.४.२०१४ रोजी अग्रिम घेतलेल्या ३.५० लाखाचे व्हाऊचर गायब आहे.अग्रिम घेतलेले २.१९ कोटी धवड यांनी परत केले नाहीत. परंतु शिरजोरी म्हणजे ३०.३.२०१५ व दि. २.६.२०१५ रोजी बनावट परतफेड झाल्याचे दाखवण्यासाठी चक्क बनावट रोकड वहीत जमेच्या नोंदी दाखवल्या. विशेष म्हणजे या दोन महिन्यात नवोदय बँकेत दोन रोकड वह्यामध्ये व्यवहार होत होते. नंतर मूळ रोकड वहीत छेडछाड करून प्रकरण दाबण्यात आले. अंकेक्षकाला मागणी करूनही या प्रकाराची पूर्ण माहिती उपलब्ध केली नाही असे अहवालात म्हटले आहे. बँकेने दोन रोकड वह्या ठेवण्याचा हा जागतिक विक्रम ठरावा. धवड यांच्याविरुद्ध त्यांच्या नवोदय शिक्षण संस्थेसाठी दि. २२.३.१३ रोजी एक कोटी कर्ज घेतल्याचे व हे कर्ज थकीत असताना पुन्हा दुसरे १.९० कोटी कर्ज दि. ३०.३.१४ रोजी मंजूर करण्याचे आहे.या कर्जांना तारण म्हणून अशोक धवड व संचालक पत्नी किरण धवड यांच्या संयुक्त नावाने असलेल्या २.३४ कोटीच्या ठेव पावत्या बँकेत दिल्या आहेत. पण या पावत्यांचे एक नूतनीकरण २०.९.१६ रोजी झाले आहे. पण त्यानंतर नूतनीकरण नाही. त्यामुळे त्यावर व्याज मिळणार नाही. नवोदय शिक्षण संस्थेने कर्जफेड केलेली नाही. त्यामुळे हे कर्ज ३.३४ कोटीपर्यंत वाढले आहे. ठेव पावत्यांचे ३ कोटी वजा केले तरी धवड दाम्पत्याकडे अजून ३३.९४ लाख थकीत झाले आहेत. अग्रिमचे २.१९ कोटी व नवोदय शिक्षण संस्थेकडे ३३.९४ लाख थकीत झाल्याने अशोक धवड व किरण धवड हे सहकार कायद्याच्या कलम ७३(फ)(फ) नुसार अपात्र ठरले आहेत. त्यांच्याकडून या दोन्ही रकमांची सक्तीने वसुली करावी असे अहवालात म्हटले आहे.
अशोक धवड यांच्या अनागोंदीने बुडली नवोदय बँक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 10:39 AM
नवोदय अर्बन बँकेचे अध्यक्ष अशोक धवड यांच्या अनागोंदी कारभारामुळे बँकेचे एकूण ६१.५२ कोटींचे कर्ज थकीत झाले आहे व त्यामुळे बँक आर्थिक संकटात आहे असा निष्कर्ष जिल्हा विशेष लेखापरीक्षक श्रीकांत सुपे यांनी नवोदय बँकेच्या विशेष अंकेक्षण अहवालात नोंदवला आहे.
ठळक मुद्देअंकेक्षण अहवालातील निष्कर्ष दोन रोकड वह्या ठेवण्याचा पराक्रम