लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवोदय बँकेचे अध्यक्ष अशोक धवड यांच्यासह अनेक संचालकांच्या घरी गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागातील पथकाने छापा मारला. त्यांच्याकडून दोन आलिशान कार जप्त केल्या. या कारवाईमुळे संबंधित वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.नवोदय अर्बन क्रेडिट को-ऑप बँकेचे अध्यक्ष अशोक धवड यांच्या धंतोलीतील निवासस्थानी गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी पोलिसांनी सलग छापेमारी केली. या प्रकरणात आरोपी असलेले धवड दाम्पत्य पोलिसांना मिळाले नाही. त्याच्या परिवारातील सदस्यांना अशोक धवड आणि किरण धवड यांच्याबाबत पोलिसांनी विचारणा केली. मात्र, परिवारातील सदस्यांनी ते कुठे आहे, त्याबाबत माहिती नसल्याचे सांगितले. दरम्यान, पोलिसांनी धवड यांच्या नावावर असलेल्या दोन आलिशान कार जप्त केल्या.उल्लेखनीय म्हणजे, नवोदय बँकेत झालेल्या कोट्यवधींच्या घोटाळ्यात बँकेचे अध्यक्ष आणि संचालकांसह २५ ते ३० जणांचा सहभाग असल्याचे पोलीस सांगतात. त्यात शहरातील काही नामवंत व्यावसायिकांचाही समावेश आहे. या सर्वांना लवकरच पोलीस अटक करतील, असा विश्वास तपास करणारे अधिकारी व्यक्त करीत आहेत.एकाला अटकधवड दाम्पत्य तसेच अन्य आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी गुरुवारी रात्रीपासून ठिकठिकाणी छापेमारी चालवली आहे. त्यात एका ठिकाणी पोलिसांना प्रसाद पिंपळे नामक संचालक हाती लागला. त्याला पोलिसांनी अटक केली.