लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाने बुधवारी नवोदय अर्बन को-ऑ परेटिव्ह बँक आर्थिक घोटाळ्यातील आरोपी माजी आमदार अशोक शंकर धवड (६५) यांचा सात दिवसाचा पोलीस कोठडी रिमांड (पीसीआर) मंजूर केला. धवड मुख्य आरोपी असून ते बँकेचे अध्यक्ष होते.सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेऊनही अटकपूर्व जामीन मिळविण्यात अपयश आल्यानंतर धवड यांनी गेल्या सोमवारी विशेष सत्र न्यायालयात आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना ताब्यात घेतले. तसेच, पोलीस कोठडी रिमांडसाठी त्यांना बुधवारी विशेष सत्र न्यायालयात हजर केले. दरम्यान, त्यांनी प्रकरणाची सखोल चौकशी करायची असल्याचे कारण सांगून धवड यांचा १४ दिवसाचा पोलीस कोठडी रिमांड मागितला. धवड यांच्या वकिलाने या मागणीला विरोध करून सात दिवसाचा पोलीस कोठडी रिमांड पुरेसा असल्याचा दावा केला. त्यानंतर न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता सात दिवसाचा पोलीस कोठडी रिमांड मंजूर केला. धवड यांच्यातर्फे अॅड. चैतन्य बर्वे तर, सरकारतर्फे अॅड. अभय जिकार यांनी बाजू मांडली.३८.७५ कोटीचा घोटाळाबँकेत ३८ कोटी ७५ लाख २० हजार ६४१ रुपयाचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणात धंतोली पोलिसांनी १५ मे २०१९ रोजी श्रीकांत सुपे (५७) यांच्या तक्रारीवरून धवड व इतर आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४०६, ४०९, ४२०, १२०-ब, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७७-अ यासह एमपीआयडी कायदा व माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला आहे. २०१४-१५ मध्ये बँकेतून ४ कोटी ३ लाख रुपयांची उचल करण्यात आली व बनावट कागदपत्राच्या आधारे ती रक्कम बँकेला परत केल्याचे दाखवण्यात आले. प्रकाश शर्मा व विकेश जोशी यांच्या नावाने प्रत्येकी १ कोटी १५ लाख रुपयाचे बनावट कर्ज प्रकरण तयार करण्यात आले. अशा विविध प्रकारे बँकेत घोटाळा करण्यात आला.
नवोदय अर्बन बँक घोटाळा : अशोक धवड यांची सात दिवसाची पोलीस कोठडी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 9:13 PM