कामठी: बोहल्यावर चढण्यापूर्वीच बालविवाह करणाऱ्या नवरदेवाला अटक करण्यात आली. नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत छावणी परिसरात गुरुवारी ही कारवाई करण्यात आली. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी व ठाणेदार विजय मालचे यांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे हा विवाह रोखण्यात आला.
नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीत बालविवाह होत असल्याची गुप्त माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांना मिळाली. त्यांनी जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी सचिन जाधव यांना याबाबत अवगत केले. यानंतर मुश्ताक पठाण, ठाणेदार विजय मालचे पोलीस पथकासह विवाह मंडपात पोहोचले. वर-वधूच्या पालकांना वधू-वरांच्या जन्माच्या दाखल्याबाबत विचारणा केली. तीत मुलीचे वय १७ तर मुलाचे वय १९ इतके दिसून आले. यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून हा बालविवाह रोखला. यासोबतच वर-वधूच्या पालकांचे समुपदेशन करण्यात आले. यानंतर वर-वधूच्या पालकाकडून लग्न न करण्यासंदर्भात हमीपत्र घेण्यात आले. यानंतर वधूच्या आईने पोलीस ठाण्यात नवरदेव शैलेश संतोष राऊत (१९, रा. रामगड, कामठी) याने आपल्या अल्पवयीन मुलीवर प्रेमजाळ्यात अडकवून अत्याचार केल्याची तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणी कलम ३७६, बाललैंगिक अत्याचार अधिनियम २०१२ नुसार गुन्हा दाखल करून शैलेश राऊत यास अटक करण्यात आली. ही कारवाई जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, संरक्षण अधिकारी विनोद शेंडे, साधना हटवार, नवीन कामठीचे ठाणेदार विजय मालचे, नायब तहसीलदार आर. टी. ऊके, दक्षता समितीचे सदस्य शीतल चौधरी, संध्या रायबोले, सुषमा सहारे, अंगणवाडी सेविका रुक्मिणी जांगीडवार यांच्या पथकाने केली.