कोराडी (नागपूर) : अश्विन नवरात्रोत्सवात देवीच्या चरणी अखंड मनोकामना ज्योत प्रज्वलित करणाऱ्यांची संख्या मोठी असते. विशेष म्हणजे, यावर्षी ही अखंड मनोकामना ज्योत केवळ विदर्भ किंवा नागपूरपुरतीय मर्यादित राहिलेली नाही. सातासमुद्रापार वसलेल्या भक्तांनीही या उपक्रमात सहभाग घेतला आहे.
रविवारपासून अश्विन नवरात्रोत्सवाला प्रारंभ हाेत आहे. त्या अनुषंगाने काेराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा माता मंदिरात तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात सलग १० दिवस हे मंदिर २४ तास खुले असते. या काळात भाविकांची गैरसाेय हाेऊ नये, तसेच प्रत्येकाला मातेचे दर्शन घेता यावे, यासाठी मंदिर प्रशासनासह पोलिस विभाग आणि शासकीय व्यवस्थाही सक्रिय झाल्या आहेत. कोराडी देवी मंदिराच्या अखंड मनोकामना ज्योतीच्या उपक्रमाला विशेष महत्त्व आहे.
दरवर्षी नागपूरसह वैदर्भीय भक्त या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होतात. यंदा या उपक्रमात पोलंडच्या हर्षल साहू या भक्ताने सहभाग घेतला. यूएसएच्या टेक्सास येथून मयुरी श्रोत्रीय यांनी सहभाग घेतला. युनाइटेड किंगडम येथील हाऊन्स्लो येथील विनाई पटेल यांनी सहभाग घेतला. तसेच दुबईहून देवांश शर्मा यांनी अखंड ज्योत प्रज्वलित केली. देशभरातील भाविकांनीही या उपक्रमात सहभाग घेतला आहे. त्यात पश्चिम बंगालच्या कांदी येथील राजेश मंडल यांनी दिल्लीच्या विकासपुरी येथील प्रतिभा त्रिपाठी यांनी, मंगळुरू येथील वीरूपक्षय्या एस. के. यांनी, ओडिशा येथील नारायणचंद्र मोहंती यांनी, राजस्थानच्या सिकार येथील क्रिष्णा सैनी यांनी, ठाण्याच्या दक्षनाथ शेट्टी यांनी, मध्य प्रदेशच्या कांताफोड येथील सावित्री यादव यांनी, हैदराबाद येथील नारायणा रेड्डी गानुगपेंटा यांनी तसेच पुण्याच्या अंकिता परिहार यांनी अखंड मनोकामना ज्योतीच्या उपक्रमात सहभाग घेतला आहे.