नागपूर : शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात होताच, देवीच्या नऊ रूपांच्या आराधनेत भक्त मंडळी तल्लीन झाली आहे. देवीच्या आराधनेचे विविध पैलू आहेत. कुणी गरबा नृत्याद्वारे देवीला आपला भाव समर्पित करतात, तर कुणी दुर्गासप्तशती पाठ करतात, तर कुणी उपवासाद्वारे मातेपुढे आपली भक्ती व्यक्त करतात. एकूणच, नवरात्रोत्सवाचे हे पर्व भक्तांसाठी अतिशय महत्त्वाचे असते आणि या काळात शक्तीचे उत्सर्जन वातावरणात होत असलेले आपण बघतो. नऊ दिवस उपवास करणाऱ्यांचे आरोग्य उत्तम राहावे आणि उपवासाच्या फराळात सात्त्विकता असावी, याबाबत आरोग्यतज्ज्ञांनी काही टिप्स दिलेल्या आहेत. त्या अशा...
उपवासाला काय खावे?
नवरात्रोत्सवाच्या उपवासात दूध, दही, ताक, ताजी फळे, ताज्या फळांचा रस, पनीर, शेंगदाणे, बदाम, अक्राेड, पिस्ता, मखाना, लवकी आदी कच्च्या भाज्या, शिंगाड्याचे थालीपीठ आदी खाणे योग्य आहे. ड्रायफ्रूट्समधील ओमेगा फॅटी ॲसिड थ्री हृदयासाठी अतिलाभकारक असते. त्यामुळे, ड्रायफूट्स कधीही उत्तम ठरतात. यासोबतच नारळपाणी, छाछ, कच्ची केळे आदींचे सेवन उत्तम ठरेल.
उपवासाला काय खाऊ नये?
साबुदाणा व साबुदाण्याचे पदार्थ, भगर, बटाटे, शिळी फळे, विक्रती ज्यूस, तळलेले पदार्थ आदी पदार्थ खाऊ नये. हे पदार्थ शरीरासाठी घातक असतात. यामुळे, शुगर वाढते आणि कार्बोहायड्रेडचे प्रमाण वाढते. पॅकेज्ड स्नॅक्समध्ये सोडियमचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे ते घेऊ नये.
डेटॉक्स डायटसाठी काय करावे, काय करू नये?
नियमित पांढऱ्या मिठाऐवजी सेंदामीठ घ्यावे. याचे अनेक लाभ आहेत. उपवास आहे म्हणून दीर्घकाळपर्यंत उपाशी राहण्यापेक्षा दूध, दही, फळांचा रस घेत राहावे. पोट शांत ठेवण्यासाठी दही, काकडी, फळे घेत राहावे. शरीरातील पाण्याचे प्रमाण व्यवस्थित ठेवण्यासाठी पाणी पित राहावे.
उपवास करताना शरीरातील पाण्याचे संतुलन राखा
उपवास करणे ही प्रक्रिया भक्तिपूर्ण असते आणि आरोग्याच्या दृष्टीने योग्यही आहे. मात्र, उपवास करताना अतिवाद टाळावा. बराच काळपर्यंत उपवास केल्याने कमजोरी, ॲनिमिया, थकवा, डोकेदुखी वाढू शकते. त्यासाठी पाणी, कमी फॅट्स असणारे दूध, नारळपाणी, फळांचा रस घ्यावा. तैलीय पदार्थ टाळावे आणि उपवासाच्या वेळी अतिपरिश्रम असणारी कामे टाळणे योग्य ठरेल. साखरेचे पदार्थ टाळावे.
- डॉ. स्वाती अवस्थी, आहार विशेषज्ञ
...............