सर्वेक्षणात दहापैकी नऊ जण पडले बुचकाळ्यात : बायकोचे टोमणे वाढणार, काय म्हणावं यांना?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विषय इंट्रेस्टिंग आहे आणि नवरा - बायकोच्या नात्यात कलह निर्माण करणाराही आहे. हा कलह कोणत्या टोकाचा असेल, हे ज्याचे त्याने ठरवावे. नवरोबा मंडळी बायको करत असलेल्या अत्याचाराचे हजारो जोक्स, मिम्स व्हायरल करत असतात आणि दुसरे आपलीही हिच व्यथा आहे, असे इमाने - इतबारे सांगत असतात. मात्र, याच नवरोबांना आपल्या बायकोचा साधा मोबाईल नंबर तरी लक्षात आहे का? असा प्रश्न विचारून बघावा. बायकोचा, सासू - सासऱ्यांचा वाढदिवस लक्षात नसल्याचे टोमणे ऐकणाऱ्या नवरोबांनी आता बायकोचा मोबाईल नंबर पाठ नसल्याचे टोमणे ऐकण्यास सज्ज राहावे, असा इशाराच ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून मिळाला आहे.
वाढती धावपळ, कायमची व्यस्तता, आयुष्य सुकर करणारे तंत्रज्ञान, वाढते संपर्क आणि व्याप, याचा परिणाम अनेकांना अनेक गोष्टी स्मरणात राहात नाहीत, हे जवळजवळ स्पष्टच आहे. खरे सांगायचे तर मोबाईल, इंटरनेटवरील उपयुक्त माहितीचा साठा करण्यासाठी असलेले गॅझेट्स पेन ड्राईव्ह, हार्डडिस्कचा जमाना गेला आहे आणि गुगल, क्लाऊड आदी नवी इनबिल्ट मेमरीची सेवा फुकट प्राप्त झाली आहे. या सेवा तुमच्या स्मरणशक्तीवरील ताण कमी करण्यास उपयुक्त असल्या तरी प्रत्येक गोष्टीसाठी तंत्रज्ञानावर विसंबून राहणे, हा रोग म्हणा वा दोष सध्या प्रत्येकाला जडला आहे. नेमक्या याच दोषामुळे आपल्या बायकोचा मोबाईल नंबर लक्षात न राहण्याचा कौटुंबीक स्तरावरचा अक्षम्य गुन्हा नवरोबांकडून घडतो आहे. शहरातील दहा जणांशी साधलेल्या संवादातून नऊ जणांना आपल्या पत्नीचा मोबाईल नंबर लक्षात नव्हता, ही बाब पुढे आली आहे.
---------------
नंबर विचारताच डोळ्यांची झाली भिंगरी!
प्रश्नांचा रॅपिड फायर व्हावा आणि त्यात तुमचे गुपित उघडणारा प्रश्न असला तर कशी डोळ्यांची भिंगरी होते. तशीच स्थिती एका ३४ वर्षीय नवरोबाची झाली. मोबाईल नंबर पाठ नव्हता, हे त्याने मान्य केले. मात्र, वृत्तपत्रात नाव देऊ नका, अशी गमतीदार विनवणीही केली. कारण, सगळ्यांनाच माहिती आहे.
-----------
एकाचा उडाला संताप
कोणी अनोळखी व्यक्ती आपल्या बायकोचा मोबाईल नंबर अचानक विचारत असेल तर स्वाभाविकच अनेक शंका, प्रश्न चेहऱ्यावर आपसुक येतील आणि संतापही उडेल. अशीच स्थिती एका ४० वर्षीय व्यक्तीची होती. मात्र, नंतर सर्वेक्षणाचा भाग असल्याचे सांगितल्यावर तो शांत झाला. मोबाईल नंबर लक्षात नाही, हे त्याने मान्य केले.
------------
एकच नंबर सिरीजमुळे नंबर पाठ
ज्याला बायकोचा मोबाईल नंबर लक्षात होता, त्याचे कारण म्हणजे एकच मोबाईल नंबरची सिरीज. स्वत:च्या मोबाईल नंबर सिरीजमधील शेवटचा आकडा आणि बायकोच्या मोबाईल नंबर सिरीजमधील शेवटचा आकडा, अंकतालिकेतील लागोपाठचा होता. उर्वरित नऊ क्रमांक एकसारखेच होते. त्यामुळे, मोबाईल पाठ करण्याची गरज नव्हती.
------------
आजही करतात डायरी मेन्टेन
एक ६० वर्षीय काकांना जेव्हा हा प्रश्न विचारला, तेव्हा ते आजही डायरी मेन्टेन करत असल्याचे दिसून आले. एकतर नवा स्मार्टफोन हाताळण्याची सवय नाही. शिवाय, वयाचा विचार करता आपल्याकडे जवळच्या लोकांच्या मोबाईल नंबरची यादी असावी, म्हणून ही डायरी होती.
---------
मोबाईल वापरतच नाही
मोबाईल युगात एक असेही काका आढळले, ते स्मार्टफोन वापरत नाहीत. मोबाईल म्हणून साधा जुना फोन आहे आणि घरी लॅण्डलाईन आहे. त्यामुळे, बायकोचा नंबर लक्षात ठेवण्याचे कारण नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यांना स्वत:चा मोबाईल नंबर व घरातील लॅण्डलाईन नंबर मुखपाठ होता.
---------
महिलांनाही नाही नवरोबांचा मोबाईल नंबर लक्षात
नवरोबांना बायकाेचा मोबाईल नंबर लक्षात नाही, हे खरे असले तरी महिलांनाही आपल्या पतीचा मोबाईल नंबर लक्षात नाही, ही बाबही तेवढीच खरी आहे. एका महिलेला याबाबत विचारले असता, त्यांनी मोबाईल नंबर लक्षात नाही, असे स्पष्ट सांगितले. एका गृहिणीला विचारले असता, घरातील सगळ्यांचे मोबाईल नंबर लक्षात राहील अशा ठिकाणी लिहून ठेवल्याचे त्या म्हणाल्या.
-------------------
अंकित आणि आंचलला मुखपाठ
अंकित चव्हाण आणि आंचल जोशी या दहा वर्षीय मुलांना विचारले असता, त्यांना आई-बाबा, शिक्षिका व काही मित्र-मैत्रिणींचे मोबाईल नंबर पाठ असल्याचे त्यांनी सांगितले. --------------
मुलांची सुरुवात असते
मोबाईल नंबर पाठ असणे, ही आता जुनी गोष्ट झाली आहे. कोणतीही नवी सुरुवात करतो, तेव्हा त्यातील प्रत्येक गोष्ट आपला मेंदू अलर्ट करत असतो. म्हणून मुलांना मोबाईल नंबर्स पाठ असतात. शिवाय, संपर्काची संख्याही खूप मोजकी असते. मात्र, टिन एजच्या वर गेल्यास मोबाईल नंबर्सचा आकडा प्रचंड वाढलेला असतो. सोबतच नव्या गुगल, क्लाऊड्स स्टोरेजची सोयही आहे. त्यामुळे, नंबर लक्षात राहात नाहीत.
- डॉ. अविनाश जोशी, ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ
..................