गोंदिया : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या नागणडाेह जंगल परिसरातून ३१ मार्च रोजी गोंदियाच्या नक्षलविरोधी अभियान पथकाने एका नक्षलवाद्याला अटक केली आहे. किसन मूरा मडावी (३१, रा. खटकाळी, ता. धानोरा, जि. गडचिरोली) असे अटक केलेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे.
गोंदिया जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील असल्याने जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हालचाली सुरू असतात. नागणडाेह जंगल परिसरात एक नक्षलवादी असल्याची माहिती नक्षल ऑपरेशन सेलला मिळाल्याने नक्षलविरोधी अभियान पथकाने त्याला पकडण्यासाठी सापळा रचला व त्या नक्षलवाद्याला अटक केली. त्याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर त्याच्याकडून १ एप्रिल रोजी जिलेटीन कांडी, एक डिटोनेटर जप्त करण्यात आला. त्याच्यावर केशोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो टिप्पागड दलमचा सदस्य असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. आठ दिवसांपूर्वी आमगाव ते सालेकसा मार्गावर जुन्या पेन्शनचे समर्थन करणारे नक्षलवाद्यांचे बॅनर रस्त्यालगत असलेल्या झाडाला लटकविण्यात आले होते. यामुळे परिसरात नक्षलवाद्यांच्या हालचाली सुरू असाव्यात, यासाठी पोलिसांची कसून चौकशी सुरू होती. यात एका नक्षलवाद्याला पकडण्यात गोंदिया पोलिसांना यश आले आहे.