देवेंद्र फडणवीस यांचे मत : नागरिकांचे विकासाला समर्थन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नक्षलींच्या भीतीमुळे गडचिरोली जिल्ह्याचा विकास थांबला होता. परंतु, यापुढे गडचिरोली जिल्ह्यात नवीन उद्योग उभारले जातील. नक्षलींना विकासानेच पराभूत केले जाऊ शकते, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पी. एल. भांडारकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उत्कृष्ट नवोदित वकील पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. लॉयडस् मेटल अॅन्ड एनर्जी कंपनीला गडचिरोली जिल्ह्यात स्पाँज आयर्न प्रकल्प सुरू करण्यासाठी शुक्रवारी जमीन हस्तांतरित करण्यात आली. यापूर्वी अनेक उद्योजकांनी गडचिरोली जिल्ह्यात प्रकल्प टाकण्यास नकार दिला होता. त्यामुळे ही नवीन सुरुवात आहे. गडचिरोली जिल्ह्यात मुबलक खनिज संपत्ती असून विकासाकरिता त्याचा उपयोग करणे आवश्यक आहे. स्थानिक नागरिकांना नक्षलवाद नको आहे. त्यांना विकासाची ओढ आहे. त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात यायचे आहे, असे फडणवीस म्हणाले. डॉ. पी. एल. भांडारकर थोर विचारवंत होते. त्यांच्या नावाच्या पुरस्काराने नवोदित वकिलांना चांगले काम करण्यास प्रोत्साहन मिळेल. परंतु, वकिलांनी जीवनात केवळ पैसा कमवायच्या मागे लागू नये. त्यांनी समाज व देशासाठी योगदान द्यावे. केवळ स्वत:साठी जगणाऱ्यांना समाज कधीच लक्षात ठेवत नाही, असे फडणवीस यांनी सांगितले. हा कार्यक्रम विदर्भ लेडी लॉयर्स असोसिएशनच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती भूषण गवई, राज्याचे महाधिवक्ता अॅड. रोहित देव, संघटनेच्या अध्यक्षा अॅड. पद्मा चांदेकर, सचिव अॅड. रितू कालिया हे उपस्थित होते. ‘लोकमत’चे राकेश घानोडे सन्मानित ‘लोकमत’चे उपसंपादक राकेश घानोडे यांना डॉ. पी. एल. भांडारकर स्मृती उत्कृष्ट विधी पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘लोकमत’मध्ये गेल्या वर्षभरात छापून आलेल्या उच्च न्यायालयातील दैनंदिन घडामोडीच्या बातम्या, विशेष बातम्या, बातम्यांतील तांत्रिक अचूकता इत्यादी बाबी घानोडे यांची पुरस्कारासाठी निवड करताना लक्षात घेण्यात आल्या. वकिली महान व्यवसाय आहे. या व्यवसायाला श्रीमंत परंपरा लाभली आहे. अनेक वकिलांनी स्वातंत्र्य लढ्यात स्वत:ला झोकून दिले होते. देशाची व समाजाची सेवा केल्याने मनाला समाधान मिळते. वकिलांनी ज्ञान मिळविण्यावर जास्त भर द्यावा. - न्यायमूर्ती भूषण गवई नवोदित वकिलांना प्रोत्साहित करण्याची व्यवस्था सध्या नाही. त्यामुळे असे पुरस्कार वकिलांचे मनोबल उंचावतात. आजचे वकील प्रतिभावंत आहेत. न्यायमूर्ती वेळोवेळी त्यांच्या पाठीवर थाप ठेवत असतात. - अॅड. रोहित देव डॉ. पी. एल. भांडारकर स्मृती पुरस्कार प्रदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अॅड. प्रवीण अग्रवाल, अॅड. स्विटी भाटिया व अॅड. समीर सोनवणे यांना डॉ. पी. एल. भांडारकर स्मृती उत्कृष्ट नवोदित वकील पुरस्कार प्रदान करण्यात आला. पंचांमध्ये कुटुंब न्यायालयाच्या सेवानिवृत्त प्रधान न्यायाधीश मीरा खडक्कार, वरिष्ठ वकील सुनील मनोहर, अॅड. अरुण पाटील व अॅड. कल्पना पाठक यांचा समावेश होता.
नक्षलींना विकासानेच पराभूत करणे शक्य
By admin | Published: May 13, 2017 2:47 AM