आनंद डेकाटे नागपूर : मध्य भारतातील उच्च प्रतिष्ठित शिक्षण संस्था असलेल्या लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला (एलआयटी) आता वॉशिंग्टन एकॉर्ड अंतर्गत आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त झाले आहे. एलआयटी मधील दोन विभागांना राष्ट्रीय मान्यता मंडळाकडून (एनबीए) मान्यता मिळाली आहे. बीटेकच्या रासायनिक अभियांत्रिकी आणि पेट्रोकेमिकल तंत्रज्ञान या दोन अभ्यासक्रमांना ३ वर्षांसाठी मान्यता मिळाली आहे. नॅक अ प्लस व एनबीए मानांकनाने एलआयटी मान्यताप्राप्त संस्था म्हणून नावारूपास आली आहे. त्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला बहुमान प्राप्त झाला आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लक्ष्मीनारायण तंत्र संस्थेला प्रतिष्ठित राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेने (नॅक) यापूर्वीच ए प्लस मानांकन दिले आहे. एनबीए मानांकन प्राप्त झाल्याने भारतातील पाच टक्केत असलेल्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये एलआयटीचा समावेश आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये ४-पॉइंट स्केलवर ३.४८ चा ग्रेड पॉइंट सरासरी (सीजीपीए) इतकी श्रेणी संस्थेने प्राप्त केली आहे. नॅक मानांकन नंतर एका वर्षाच्या कालावधीतच संस्थेच्या केमिकल इंजिनिअरिंग आणि पेट्रोकेमिकल टेक्नॉलॉजी या दोन विभागांनी राष्ट्रीय मान्यता मंडळ (एनबीए) कडे मान्यतेसाठी अर्ज सादर केले होते. एनबीए तज्ञ पथकाने ६ ते ८ मे २०२३ दरम्यान भेट देत संस्थेची पाहणी केली. या तज्ञ पथकामध्ये डॉ. सुरेश गर्ग, डॉ. टी. के. राधाकृष्णन आणि डॉ. बी. एन. राय यांच्या पथकाने रासायनिक अभियांत्रिकी विभाग तर डॉ. अनुपमा शर्मा आणि डॉ. आनंद किशोर कोला यांच्या पथकाने पेट्रोकेमिकल तंत्रज्ञान विभागाचे मूल्यांकन केले.
एलआयटी मधील अर्ज केलेले दोन्ही विभाग आता ३ वर्षांकरिता एनबीएद्वारे मान्यता प्राप्त झाले आहे, ही फार अभिमानाची बाब आहे. या मानांकनामुळे कुवेत आणि आखाती देशांमध्ये कार्यरत असलेल्या एलआयटीच्या पदवीधरांच्या प्रलंबित समस्येचे निराकरण झाले आहे.विद्यार्थी, कर्मचारी आणि प्राध्यापकांच्या अनेक वर्षांच्या परिश्रमाचे आणि परिश्रमामुळेच संस्थेला ही ओळख मिळाली आहे. अत्याधुनिक पायाभूत सुविधा, शास्त्रोक्त पद्धतीने चालवलेले अध्यापनशास्त्र, मजबूत उद्योग सहयोग आणि जगभरातील प्रख्यात माजी विद्यार्थ्यांसह, संस्था केवळ गुणवंत विद्यार्थ्यांनाच आकर्षित करत नाही तर त्यांच्या अखंड प्लेसमेंट समर्थनासह, त्यांना उच्च वाढीतील करिअर घडविण्यातही संस्था मदत करत करते.डॉ. राजू मानकर, संचालक एलआयटी