नागपूर: महापालिकेत एका सहायक आयुक्तांकडे तीन पदभार आहेत. त्यांच्याकडे समस्या घेऊन गेल्यावर ते भेटत नाहीत, समस्या सोडवत नाहीत. मनपा आयुक्त शुक्रवार सोडून भेटत नाहीत. महापालिकेत प्रशासकराज असल्याने अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. माजी नगरसेवक काम घेऊन आयुक्तांकडे गेल्यावर पोलिस बोलावून घेतात.
वेळ देऊनही भेटत नसल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे मनपा आयुक्त हुकूमशाह असल्याचा आरोप करीत संविधान चौकात धरणे आंदोलन केले. महापालिका आयुक्तांचा फोटो झळकावत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या विरोधात घोषणाबाजी केली. राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष वेदप्रकाश आर्य यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात भोला बैसारे, अशोक काटले, रमेश फुले, महेंद्र भांगे, सुनील लांजेवार, नंदू माटे, प्रकाश भोयर, राजू बैसवारे, संदीप मेंढे, संजय धापोडकर, मनीष फुलझेले आदी सहभागी झाले होते.
यावेळी वेदप्रकाश आर्य म्हणाले, झोनचे सहायक आयुक्त भेटत नाहीत. अतिरिक्त आयुक्त सांगतात माझ्याकडे अधिकार नाहीत. मनपा आयुक्त शुक्रवारी ४ वाजताच भेटतात. इतर दिवशी लोकांच्या समस्यांसंदर्भात भेटत नाहीत. आवाज जोरात केल्यावर पोलिस बोलावून घेतात. माजी नगरसेवकांना ही ट्रीटमेंट असेल तर जनतेचे काय हाल असतील. प्रशासकराजमध्ये लोकांना प्रचंड त्रास होत आहे.