लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्याकांड प्रकरणावरून बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला. या प्रकरणात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचादेखील अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लावला. सकाळी फडणवीस यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानाजवळ आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना निवासस्थानापासून काही अंतरावरच रोखले.
निमगडे प्रकरणाचा तपास सीबीआय व नागपूर पोलीस यांच्याकडून समांतरपणे करण्यात येत होता. नागपूर पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावला. कोट्यवधीच्या जमिनीच्या वादातून आर्किटेक्ट एकनाथ निमगडे यांची हत्या करण्यासाठी गँगस्टर रंजीत सफेलकर याने पाच कोटींची सुपारी घेतल्याची बाब समोर आली. यात फडणवीस यांचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप राष्ट्रवादीतर्फे करण्यात आला. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले. या प्रकरणाची सीबीआयतर्फे निष्पक्ष चौकशी व्हावी तसेच देवेंद्र फडणवीस व त्यांचे खाजगी सचिव कुमार मसराम यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी राष्ट्रवादीतर्फे करण्यात आली.
ना मास्क ना फिजिकल डिस्टन्सिंग
सद्यस्थितीत नागपुरातील कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढत आहे. अशास्थितीत सत्ताधारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या आंदोलनात पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या नियमांना तिलांजली दिली. अनेक जण विना मास्कचे होते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष शैलेंद्र तिवारी, वर्षा श्यामकुळे इत्यादी पदाधिकारी विना मास्कचे होते.
चौकशी सीबीआयकडे, फलक सीआयडीचे
संबंधित प्रकरण २०१६ सालीच सीबीआयकडे वर्ग करण्यात आले होते. मात्र सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मात्र सीआयडीने पाच वर्षात आरोपींना अटक का केली नाही, असे फलक दर्शविले. प्रत्यक्षात सीबीआयकडे प्रकरण असताना सीआयडी कशी काय कारवाई करेल, असा प्रश्न तेथील उपस्थितांनी विचारला.