नागपूर : आगामी निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला ओबीसी समाजाची आठवण आली व ओबीसी मेळावे घेण्यास सुरुवात झाली. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसने दरवेळी ओबीसी समाजाच्या योजनांना विरोध केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्षच ओबीसी समाजाचा सर्वात मोठा शत्रू आहे. त्यांनी घेतलेले ओबीसी शिबिर एक नौटंकीच होती, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
सत्तेत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसने कधीच ओबीसींचा विचार केला नाही. दरवेळी ओबीसींच्या योजनांना विरोध केला. भाजपने कधीच ओबीसीवर अन्याय केलेला नाही. देशाचे पंतप्रधानच ओबीसी आहेत. मात्र राष्ट्रवादीकडून नेहमी खोटारडे आरोप करत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, असे बावनकुळे म्हणाले. महाविकास आघाडीचे सरकार ओबीसी आरक्षणाबाबत गंभीर नव्हते, मात्र शिंदे-फडणवीस यांच्या सरकारने ओबीसींना आरक्षण मिळवून दिले. राष्ट्रवादीकडे कधीही ओबीसी मते जाणार नाहीत. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेदेखील हे चांगल्याने जाणतात, असे बावनकुळे म्हणाले.
शिंदेंच्या उमेदवारांना जास्त ताकदीने मदत करणार
लोकसभा व विधानसभा निवडणुकींचे पूर्ण नियोजन तयार आहे. लवकरच भाजपतर्फे लोकसभा व विधानसभा निवडणूक प्रमुख जाहीर करण्यात येतील. भाजपच्या उमेदवारांपेक्षा शिंदे यांच्या उमेदवारांना जास्त ताकदीने मदत करू, असे बावनकुळे यांनी सांगितले.