नागपूर : काँग्रेसपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही रामटेक लोकसभेच्या जागेवर दावा केला आहे. रामटेकची जागा शिवसेनेने जिंकली होती. मात्र, आता खा. कृपाल तुमाने व आ. आशिष जयस्वाल हे दोघेही शिंदे गटात सहभागी झाले आहेत. शिवसेना विभागल्यामुळे कमजोर झाली आहे. राष्ट्रवादी जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघांत लढते. त्यामुळे रामटेक लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडावी, अशी मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्याकडे केली.
वर्धा, अमरावती, गडचिरोली व नागपूर या चार लोकसभा मतदारसंघांची स्थिती जाणून घेण्यासाठी बुधवारी प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी मुंबईत बैठक बोलाविली होती. या बैठकीला ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल, विरोधी पक्षनेते अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ, अनिल देशमुख हे प्रमुख नेते उपस्थित होते. बैठकीत जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी काँग्रेसला जिल्ह्यात विधानसभेच्या सहापैकी चार दिल्या जातात. त्यामुळे लोकसभेची जागा राष्ट्रवादीने मागावी, अशी मागणी केली. काँग्रेस लढत असलेल्या चार विधानसभा मतदारसंघांतही राष्ट्रवादीची बऱ्यापैकी ताकद आहे. जिल्ह्यात तिसऱ्या क्रमाकांवर असलेल्या शिवसेनेला (ठाकरे गट) लोकसभेची उमेदवारी देणे योग्य होणार नाही, अशीही बाजू गुजर यांनी मांडली. बैठकीत माजी आ. प्रकाश गजभिये, राजाभाऊ ताकसांडे व रमेश फुले यांनी पक्षाने उमेदवारी दिली तर आपली ताकदीने निवडणूक लढण्याची तयारी असल्याचे सांगितले. बैठकीला कार्याध्यक्ष विलास झोडापे, सलील देशमुख, लीलाधर धनविजय, राजाभाऊ आखरे, संतोष नरवडे, अनुप खराडे, बंडोपंत उमरकर, अनिल साठवणे, विलास कांबळे आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेतही डावलले जाते
- विधानसभा निवडणुकीत आघाडीमध्ये राष्ट्रवादीला काटोल व हिंगणा हे दोनच मतदारसंघ दिले जातात. काँग्रेस उर्वरित चार मतदारसंघांत लढते. याचे परिणाम जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भोगावे लागतात. या निवडणुकीतही आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला कमी जागा येतात. असेच सुरू राहिले तर जिल्ह्यात राष्ट्रवादी वाढणार कशी, असा प्रश्नही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.