छत्रपतींचा अपमान करणाऱ्या अतुल भातखळकरांना अटक करा, राष्ट्रवादीच्या आमदारांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 03:08 PM2018-07-17T15:08:27+5:302018-07-17T15:11:44+5:30
'मनूवादी भातखळकरांचा निषेध असो...भातखळकरांचे निलंबन करा...छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या विधानसभेतील छिंदमला अटक करा...भाजपा सरकारचा निषेध असो...', अशी घोषणाबाजी करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले.
नागपूर - 'मनूवादी भातखळकरांचा निषेध असो...भातखळकरांचे निलंबन करा...छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या विधानसभेतील छिंदमला अटक करा...भाजपा सरकारचा निषेध असो...', अशी घोषणाबाजी करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार शशिकांत शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार विजय भाबळे, आमदार प्रदीप नाईक, आमदार संजय कदम आदींसह सर्वच आमदार सहभागी झाले होते.
मंगळवारी विधानसभेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाच्या उंचीचा विषय चांगलाच गाजला. यावेळी चर्चा सुरु असतानाच भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी विरोधक ‘भलत्याच’ गोष्टींवर चर्चा करतात असे म्हटल्यानंतर सभागृहामध्ये गदारोळ झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि काँग्रेस पक्षाचे आमदार आक्रमक झाले आणि त्यांनी वेलमध्ये उतरत जोरदार घोषणाबाजी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो...जय भवानी,जय शिवाजी अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी भातखळकरांच्या निलंबनाची मागणी लावून धरली. त्यामुळे सुरुवातीला १० मिनिटांसाठी आणि नंतर पुन्हा १५ मिनिटासाठी सभागृहाचे कामकाज तहकुब करण्यात आले.
याचवेळी विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी अतुल भातखळकरांचे निलंबन केल्याशिवाय आम्ही सभागृह चालू देणार नाही, असा इशारा सभागृहात दिला. ही मनूवादी प्रवृत्ती आहे. महाराष्ट्रात राहता आणि छत्रपतींचा अपमान करता याचा निषेधही विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केला.